वसमतच्या आमदारांचा मंत्रालयात एल्गार! आमदार राजूभैय्या नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट; दुष्काळ, मराठा आरक्षण आणि शेतकरी आत्महत्येबाबत आग्रही मागणी
हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या आमदारांचा मंत्रालयात एल्गार! आमदार राजूभैय्या नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट; दुष्काळ, मराठा आरक्षण आणि शेतकरी आत्महत्येबाबत आग्रही मागणी
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
मुंबई / वसमत:
वसमत विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील प्रलंबित आणि अत्यंत संवेदनशील प्रश्नांवर आमदार राजूभैय्या नवघरे हे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर आणि सभागृहात लढा देणाऱ्या राजूभैय्या नवघरे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील गंभीर समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सकारात्मक निर्णयाची मागणी
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या उपोषणाची आणि मराठा समाजाच्या रास्त मागण्यांची सरकारने तातडीने दखल घ्यावी. या संवेदनशील विषयावर विनाविलंब सकारात्मक निर्णय देऊन समाजाला दिलासा द्यावा, अशी रोखठोक मागणी आमदार राजूभैय्या नवघरे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे लावून धरली.
हिंगोली जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून मदत द्या!
यंदा वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी पुरता कोलमडला आहे. या गंभीर परिस्थितीची शासनाने तात्काळ दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि आवश्यक त्या सर्व आपत्कालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
मृत कमलबाई कांदे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात व आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण
दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या कर्जाच्या वास्तवाला कंटाळून वसमत तालुक्यातील गोजेगाव येथील महिला शेतकरी कमलबाई सोपान कांदे यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेवर अत्यंत दुः ख व्यक्त करत आमदार नवघरे यांनी पीडित कांदे कुटुंबाला शासनाकडून तातडीने भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यासोबतच, बळीराजाला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी आणि अशा दुर्दैवी आत्महत्या कायमच्या रोखण्यासाठी शासनाने तत्काळ ठाम व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
जनतेच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

