वसमत हादरले! ३३ वर्षीय तरुणाची पडक्या रेस्ट हाऊसमध्ये दगड ठेचून निघृण हत्या; पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल
हरनामसिंग चव्हाण

वसमत हादरले! ३३ वर्षीय तरुणाची पडक्या रेस्ट हाऊसमध्ये दगड ठेचून निघृण हत्या; पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल
वसमत (प्रतिनिधी हरनामसिंग चव्हाण):
वसमत शहरात एका ३३ वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अभिजित रत्नाकर शहाणे (वय ३३ वर्षे, रा. सुवर्णकार कॉलनी, मालेगाव रोड, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पडक्या खोलीत आढळला मृतदेह
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपासून ते १८ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास वसमत येथील एरिकेशन कॅम्प परिसरातील एका जुन्या पडक्या रेस्ट हाऊसच्या खोलीत हा भीषण प्रकार घडला. अज्ञात आरोपीने कोणत्याही कारणावरून अभिजित शहाणे यांच्या डोक्यात जबर दगड मारून त्यांची निर्घृण हत्या केली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या संदर्भात संजय प्रभाकर टाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रार क्रमांक ०५८५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी; तपासाची चक्रे वेगाने!
घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्र, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भोसले आणि सपोनि डेडवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
सध्या या हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून अत्यंत तीव्रतेने सुरू असून, अज्ञात आरोपीचा माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. या घटनेमुळे वसमत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

