ताज्या घडामोडी

वसमतच्या बळीराजासाठी आमदार राजूभैय्या नवघरे आक्रमक! मराठवाड्याच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भिडले; कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून तातडीने पंचनाम्यांचे आदेश

हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या बळीराजासाठी आमदार राजूभैय्या नवघरे आक्रमक! मराठवाड्याच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भिडले; कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून तातडीने पंचनाम्यांचे आदेश

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

नांदेड / वसमत:
मराठवाड्यात पावसाच्या ओढीने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज नांदेड येथे राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वसमत विधानसभेचे धडाडीचे आमदार राजूभैय्या नवघरे यांनी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडत शासनदरबारी जोरदार आवाज उठवला. “वसमतच्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा माझ्यासाठी राजकीय विषय नसून माझ्या मातीशी अन् बळीराजाशी जोडलेली निष्ठा आहे,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाम भूमिका मांडली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे ठाकले राजूभैय्या!
वसमत तालुक्यात पावसाच्या मोठ्या खंडाने कापूस, हळद, ऊस आणि सोयाबीन या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा उपसा करावा तर वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व वास्तववादी अन् कठीण परिस्थितीचा पाढा आमदार राजूभैय्या नवघरे यांनी कृषीमंत्र्यांसमोर वाचला. निसर्गाच्या कोपाने हवालदील झालेल्या वसमतच्या बळीराजाला तातडीने मदतीचा हात मिळालाच पाहिजे, अशी रोखठोक मागणी करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
अफवा पसरवणाऱ्यांना थेट इशारा; वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी
गेल्या काही दिवसांपासून ‘वसमत तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळला’ अशा प्रकारची खोटी पत्रे अन् अफवा सोशल मीडियावर पसरवून शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकाराची आमदार नवघरे यांनी गंभीर दखल घेतली. “संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या आणि खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करा,” अशी आक्रमक मागणी त्यांनी बैठकीत लावून धरली.
कृषीमंत्र्यांनी घेतली दखल; ‘प्रशासनाने थेट बांधावर जावे!’
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या आक्रमक अन् तळमळीच्या सादरीकरणानंतर कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले. “राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून अधिकाऱ्यांनी टेबलवर बसून निर्णय न घेता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे वास्तववादी आढावे व पंचनामे करावेत,” असे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले.
“शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत लढा सुरूच राहील”
वसमतच्या प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज विधिमंडळापासून ते शासनदरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार राजूभैय्या नवघरे हे सातत्याने रात्रंदिवस एक करत आहेत. “माझ्या वसमतच्या बळीराजाला त्याच्या हक्काची मदत आणि भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही,” असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. आमदार नवघरे यांच्या या धडाडीच्या आणि शेतकरीहितैषी भूमिकेमुळे संपूर्ण वसमत तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button