मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर वसमतचे आमदार राजूभैय्या नवघरे आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक मदत पॅकेजची मागणी
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर वसमतचे आमदार राजूभैय्या नवघरे आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक मदत पॅकेजची मागणी
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत:
मराठवाड्यात यंदा जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अल्प व खंडित पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत (उर्फ) राजूभैय्या नवघरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसारखी महत्त्वाची पिके पाण्याअभावी सुकू लागली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सोबतच विहिरी आणि बोअरवेल आटल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
आमदार राजूभैय्या नवघरे यांनी पत्राद्वारे केलेल्या प्रमुख मागण्या
प्रत्यक्ष पंचनामे बाधित खरीप पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.
पीक विमा भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी.
विशेष आर्थिक पॅकेज पीक विमा योजनेच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि सोयाबीनसह सर्व पिकांसाठी हेक्टरी विशेष नुकसानभरपाई जाहीर करावी.
कर्ज वसुलीस स्थगिती शेतकऱ्यांवरील पीक कर्जाच्या वसुलीस तातडीने स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे.
कृषी निविष्ठा मदत: पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर आवश्यक कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी.
चारा व पाणी व्यवस्था जनावरांसाठी चारा डेपो/चारा छावण्या उभारून पिण्याच्या पाण्याची तातडीने सोय करावी.
गावनिहाय आढावा परिस्थितीचा गावनिहाय आढावा घेऊन दुष्काळसदृश परिस्थितीबाबत आवश्यक ते निर्णय घ्यावेत.
“ही मागणी केवळ पत्रापुरती मर्यादित नसून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून सोडवण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील,” असा विश्वास आमदार राजूभैय्या नवघरे यांनी व्यक्त केला आहे.

