नांदेड येथील इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरण: वसमत येथे सिकलीगर समाजाकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

नांदेड येथील इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरण: वसमत येथे सिकलीगर समाजाकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
नांदेड येथील दुध डेअरी परिसरात पेट्रोल पंपाजवळ ८ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या इंद्रजीतसिंग बलजीतसिंग बावरी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन वसमत येथील सिकलीगर समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी (उपविभागीय कार्यालय, वसमत) यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. या घटनेतील आरोपींचा आणि के. बी. गँगचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही गँग नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून, आरोपी विविध कारणांमुळे लवकर जामिनावर मुक्त होत असल्याने तपासाबाबत मृतकाच्या कुटुंबाच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये सुमारे ९ व्यक्ती या घटनेत सहभागी असल्याचे आणि चारही बाजूंनी देखरेख ठेवत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय आणखी काही व्यक्तींचा यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणातील सर्व पुरावे, महत्त्वाचे पैलू आणि संबंधित व्यक्तींची योग्य चौकशी व्हावी, तसेच सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी वरिष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र ‘एसआयटी’ (SIT) पथक स्थापन करून कालबद्ध चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतेवेळी सिकलीगर समाजातील किरणसिंग चव्हाण (टाक), संतूसिंग चव्हाण, तुफानसिंग चव्हाण, अजयसिंग चव्हाण,किसनसिंग,हिम्मतसिंग बावरी, रविंद्रसिंग बावरी, बलजितसिंग बावरी, छाला सिंग,साहेब सिंग,बचनसिंग, गुलाब सिंग, भारत सिंग, संगीत सिंग, संदीपसिंग,करणंसिंग रेशम सिंग यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.

