ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दत्तात्रेय गुरुनाथ हेर्लेकर साहेब यांना ओम गार्डन येथे भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्य संपादक हरणामसिंग चव्हाण

ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दत्तात्रेय गुरुनाथ हेर्लेकर साहेब यांना ओम गार्डन येथे भावपूर्ण श्रद्धांजली

लोकमंच टाईम्स मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण :
पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत, विकासात आणि प्रगतीमध्ये मोलाचा सिंहाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दत्तात्रेय गुरुनाथ हेर्लेकर साहेब यांचे १ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नांदेड रोड येथील ‘ओम गार्डन मंगल कार्यालय’ येथे भव्य श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम हेर्लेकर कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कारखान्याशी ४० ते ४५ वर्षांचा जिव्हाळ्याचा संबंध
दिवंगत दत्तात्रेय हेर्लेकर साहेब यांचा पूर्णा सहकारी साखर कारखान्याशी तब्बल ४० ते ४५ वर्षांचा अविरत आणि अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. कारखान्याच्या प्रारंभापासून उभारणीपर्यंत आणि त्याच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, अभ्यासू मार्गदर्शनाचा आणि कार्यतत्परतेचा कारखान्याच्या उत्कर्षात मोठा वाटा राहिला. कारखान्याचे आजी-माजी कर्मचारी, संचालक मंडळ आणि परिसरातील नागरिकांशी त्यांचे कौटुंबिक व आपुलकीचे संबंध होते. त्यांच्या निधनाने कारखाना परिवारासह संपूर्ण परिसराने एक आधारवड आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या श्रद्धांजली सभेस पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयप्रकाशजी दांडेगावकर, कारखान्याचे सर्व संचालक मंडळाचे सदस्य, सभासद शेतकरी, आजी-माजी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय, कपिश्वर शुगर (जवळाबाजार) येथील अधिकारी-कर्मचारी तसेच पिंपळाचौरे, बाभूळगाव, वसमत परिसरातील नागरिक आणि हेर्लेकर साहेबांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भावनांचा बांध फुटला, उपस्थितांनी जागवल्या आठवणी
श्रद्धांजली सभेत बोलताना उपस्थितांनी हेर्लेकर साहेबांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “हेर्लेकर साहेबांनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरतील,” अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदीर्घ कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना अनेक सहकारी आणि नागरिक भावुक झाले होते.
सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत श्री. दत्तात्रेय हेर्लेकर साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले आणि हेर्लेकर परिवाराप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या.
छाया / वृत्त : नागेश चव्हाण, वसमत

