‘संवाद बांधावरचा!’: शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध; आमदार राजू भय्या नवघरे यांचा आंबा व शिरड शहापूर परिसरात थेट संवाद
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

‘संवाद बांधावरचा!’: शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध; आमदार राजू भय्या नवघरे यांचा आंबा व शिरड शहापूर परिसरात थेट संवाद

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत
आपल्या मतदार संघातील लोकांशी आणि शेतकरी बांधवांशी थेट व सहज संवाद साधण्यासाठी आमदार राजू भय्या नवघरे यांनी ‘संवाद बांधावरचा’ या उपक्रमांतर्गत आज आंबा व शिरड शहापूर परिसरातील शिवारांमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या लवकरात लवकर सोडविण्याचा शब्द आमदार नवघरे यांनी यावेळी दिला.
आंबा व शिरड शहापूर येथील भेटीदरम्यान आमदार राजू भय्या नवघरे यांनी शेतकरी बांधवांसोबत चहा घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून एका सामान्य कुटुंबातील सदस्याप्रमाणे रंगलेल्या या संवादात प्रामाणिकपणा आणि आपुलकीची प्रचिती आली. “शेतकऱ्यांसाठी मी त्यांचा हक्काचा राजू आहे आणि माझ्यासाठी ते सर्व माझी आपली माणसं आहेत,” अशी भावना यावेळी आमदार नवघरे यांनी व्यक्त केली.
शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्यांनी मांडलेले विविध प्रश्न, शेतीविषयक अडचणी आणि स्थानिक समस्या त्यांनी अत्यंत गांभीर्याने समजून घेतल्या. तसेच या सर्व प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून लवकरच योग्य ते समाधान व तोडगा काढला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी शेतकरी बांधवांना दिला.
“शेतकरी बांधवांनी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने दिलेल्या चहाची चव आणि समाधान कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलच्या चहामध्येही नाही,” अशा शब्दांत आमदार राजू भय्या नवघरे यांनी शेतकऱ्यांच्या अकृत्रिम प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लोकप्रतिनिधी स्वतः शेताच्या बांधावर येऊन विचारपूस करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

