ताज्या घडामोडी

महसूल विभागाच्या कार्यक्षमतेमुळे प्रशासनात विश्वासार्हता – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  आरटीएस आणि विशेष सखोल पुनरीक्षणात हिंगोली जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी  महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

महसूल विभागाच्या कार्यक्षमतेमुळे प्रशासनात विश्वासार्हता – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
आरटीएस आणि विशेष सखोल पुनरीक्षणात हिंगोली जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव

लोकमंच टाईम्स (विशेष प्रतिनिधी)

हिंगोली, ३ ऑगस्ट:
“महसूल विभाग हा प्रशासनाचा मुख्य कणा असून, विविध समस्या आणि जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता या विभागात आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा करून तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महसूल विभागाच्या या कार्यक्षमतेमुळेच प्रशासनात विश्वासार्हता निर्माण झाली आहे,” असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘महसूल दिन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजूषा मूथा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भविष्यात लॅपटॉप आणि महसूल वसाहतीची सुविधा
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पुढे म्हणाले की, “लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना कामासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून, कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याची तसेच महसूल वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ‘समाधान शिबिरा’चेही आयोजन करण्यात येत आहे.”
प्रमुख मान्यवरांचे मनोगत
नकारात्मकतेवर मात करून यश मिळवा – विवेक गायकवाड (मुख्य कार्यकारी अधिकारी):
“सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास संकटांवर मात करून यश निश्चित मिळते. हिंगोली जिल्ह्याची आरटीएस व पुनरीक्षण मोहिमेतील कामगिरी कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेनेही ‘सेवाकर्मी’ आणि ‘आयगॉट’ अंतर्गत कर्मयोगी भारत पुरस्कार मिळवून आपली उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे.”

पुरस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढते – डॉ. श्रेणिक लोढा (पोलीस अधीक्षक):
“वर्षभरात केलेल्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले की कर्मचाऱ्यांची ऊर्जा द्विगुणित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असून, पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी हीच लय पुढेही कायम ठेवावी.”

महसूल विभागाने आपली प्रतिष्ठा जपली – महेंद्रकुमार कांबळे (अपर जिल्हाधिकारी):
“जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्याला राज्यात अग्रक्रम मिळाला आहे. निष्काम भावनेने काम करणारा कर्मचारी हाच खरा ‘महसूल रत्न’ असतो.”

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
या प्रसंगी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
क्र. गौरविण्यात आलेले प्रमुख अधिकारी/कर्मचारी पद

१ महेंद्रकुमार कांबळे | अपर जिल्हाधिकारी
२ प्रतीक्षा भूते उपविभागीय अधिकारी (कळमनुरी)
३ हरीश गाडे तहसीलदार (औंढा नागनाथ)
४ प्रगती चोंडेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी
५ सखाराम मांडवगडे तहसीलदार
६ | विनोद डोणगावकर नायब तहसीलदार
याशिवाय कैलास मठपती (लघुलेखक), अनिल पाथरकर (सहायक महसूल अधिकारी), आशा गिते (मंडळ अधिकारी), रविंद्रकुमार मस्के (महसूल सहायक), राहुल कोल्हे (ग्राम महसूल अधिकारी), मारोती सिरसाट (वाहनचालक), पवन यादव (शिपाई), केशव पलटनकर (महसूल सेवक) आणि तरन्नूम शेख (पोलीस पाटील) यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले, तर सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांनी केले. या सोहळ्यास जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button