शिवदास पोटे यांच्या ‘आवाकोंडी’ कथासंग्रहाचे वसमत येथे दिमाखात प्रकाशन
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

शिवदास पोटे यांच्या ‘आवाकोंडी’ कथासंग्रहाचे वसमत येथे दिमाखात प्रकाशन

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत:
माणूस आणि गावगाड्याच्या तळातून वर आलेल्या कथांचा वस्तुपाठ असलेल्या, कथाकार शिवदास पोटे लिखित ‘आवाकोंडी’ या मराठवाडी बोलीतील कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा वसमत येथील सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात उत्साहात आणि दिमाखात पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी आणि लेखक मा. प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत विधानसभेचे आमदार मा. चंद्रकांत (राजूभैय्या) नवघरे हे उपस्थित होते.
साहित्यातून मराठवाडी बोलीचा सशक्त आविष्कार
पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी, “ग्रामीण भागातील जीवनसंघर्ष आणि बोलीभाषेचा अस्सल अनुभव ‘आवाकोंडी’ कथासंग्रहातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे,” असे सांगत लेखकाच्या लेखनाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात आमदार चंद्रकांत नवघरे यांनी वसमतच्या भूमीत अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती होणे ही भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन केले.
मान्यवरांची उपस्थिती व भाष्य
या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथालेखक मा. आसाराम लोमटे आणि सुप्रसिद्ध कथालेखक मा. बालाजी सुतार यांनी कथासंग्रहावर सखोल भाष्य केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मा. विकास माने, उपविभागीय अधिकारी (नांदेड) मा. डॉ. सचिन खल्लाळ, शिक्षणाधिकारी मा. मंजुश्री कल्लेवाड, मा. प्रा. विठ्ठल भुसारे, गटविकास अधिकारी मा. प्रफुल्ल तोटेवाड, गटशिक्षणाधिकारी मा. योगेश पाटील, ‘महाराष्ट्र संचार’चे संपादक मा. उत्तम मांजरमकर, आय.एम.ए. अध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब सेलूकर, प्रकाशक मा. डॉ. विनायक येवले, ज्येष्ठ समाजसेवक मा. शंकर नांदेडकर, आणि चित्रकार मा. दिलीप दारव्हेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, साहित्यिक प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन हस्ताक्षर प्रकाशन गृह व मराठवाडी बोली गणगोत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. उपस्थित रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

