विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बोजवारा! नरहर कुरुंदकर विद्यालय परिसरात मटन विक्री; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात एल्गार
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बोजवारा! नरहर कुरुंदकर विद्यालय परिसरात मटन विक्री; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात एल्गार
लोकमंच टाईम्स
कुरुंदा (विशेष प्रतिनिधी):
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर विद्यालय व मदिनानगर परिसरातील चोंडी-कुरुंदा रस्त्यावर उघड्या पडलेल्या बेकायदेशीर मटन दुकानांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा गंभीर धोक्यात आली आहे. शाळेच्या अगदी उशाशी सुरू असलेल्या या ३ मटन टपऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचा वावर आणि रोजची वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराविरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी कुरुंदा ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत प्रशासक सरपंचांना तात्काळ दुकाने हटवण्याचे कडक निवेदन दिले.
भटक्या कुत्र्यांचा गराडा अन् उर्मट उत्तरे
सकाळी शाळा भरताना आणि सुटताना रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्याच वेळी मटन खरेदीदारांच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मटनाचे उरलेले अवशेष आणि कचरा थेट रस्त्यावर फेकला जात असल्याने १० ते १५ भटक्या कुत्र्यांची टोळी तिथे घुटमळत असते, ज्यामुळे लहान मुलांवर हल्ल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या त्रासाबद्दल जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना “अपघात होणार असेल तर होऊ द्या!” अशी अरेरावीची आणि उर्मट भाषा दुकानदारांकडून वापरली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
प्रशासनाला ३० हून अधिक ग्रामस्थांचा अल्टीमेटम
शालेय परिसरातील शैक्षणिक वातावरण आणि आरोग्य जपण्यासाठी ही दुकाने तात्काळ दूर हलवण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत वसमतचे तहसीलदार आणि कुरुंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आली आहे.
निवेदनावर प्रमुख स्वाक्षऱ्या:
सदाशिव गवळी, शंकर जाधव, मनोज इंगोले, शेख इसा, बबनराव इंगोले, शेख युनूस, जगन्नाथ कदम, विठ्ठल तांबोळी, श्रीराम इंगोले, अहमद भाई मिस्त्री, गजानन इंगोले, विठ्ठल इंगोले, शेख हुसेन, महानंदाबाई इंगोले, बहिणाबाई इंगोले, संतोष गिरबिडे, अमोल फोले, दशरथ जाधव, सुनील लोखंडे, एम. एस. पठाण, कदम आर. बी., शिवाजी डाकुलगे, रमेश कन्नेवार, राधाकिशन रामगिरे, मधुकर भुसे, अमोल सखाराम, राधेश्याम वाळके व भक्ती वाळके यांच्यासह अनेक नागरिकांचा समावेश आहे.
प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

