वसमत शहरात मोंढ्यातील गोडाऊनचे पत्रे उचकटून २ लाख ३५ हजारांची हळद लांबवली; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत शहरात मोंढ्यातील गोडाऊनचे पत्रे उचकटून २ लाख ३५ हजारांची हळद लांबवली; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमंच टाईम्स
मु
ख्य संपादक:हरनामसिंग चव्हाण
वसमत शहरातील नवा मोंढा भागातील गोडाऊनचे छताचे पत्रे बाजूला सरकवून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ४७ कट्टे हळद चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील व्यापारी शाम नंदकिशोर भराडीया आणि सुमीत काकडे यांनी नवा मोंढा वसमत येथे भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये खरेदी केलेला माल ठेवला होता. दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास गोडाऊन व्यवस्थित बंद करण्यात आले होते.
दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास मुनिमाने गोडाऊन उघडून पाहणी केली असता, हळदीच्या पोत्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. अधिक पाहणी केली असता, गोडाऊनच्या छताचे पत्रे बाजूला सरकवलेले दिसून आले. चोरट्यांनी छतावाटे आत प्रवेश करून भराडीया यांच्या गोडाऊनमधून १९ कट्टे (किंमत रु. ९५,०००/-) आणि शेजारील काकडे यांच्या गोडाऊनमधून २८ कट्टे (किंमत रु. १,४०,०००/-) अशी एकूण ५५ किलो वजनाची ४७ कट्टे हळद (एकूण किंमत रु. २,३५,०००/-) लांबवली.
या प्रकरणी शाम भराडीया यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

