ताज्या घडामोडी

महिलांचा अवमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही – सचिन दगडू हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

महिलांचा अवमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही – सचिन दगडू
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर

लोकमंच टाईम्स (विशेष प्रतिनिधी, वसमत):

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व बेताल वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून, वसमतमध्ये या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आमदार लक्ष्मीकांत भैय्या नवघरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडक देऊन निवेदनाद्वारे संबंधित नेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची ठाम मागणी केली.
या निषेध आंदोलनात वसमत नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सचिन विठ्ठल दगडू यांनी उपस्थित राहून काँग्रेसच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
पत्रकारांशी बोलताना गटनेते सचिन दगडू अत्यंत आक्रमकपणे म्हणाले, “लोकशाहीने प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, राजकारणात वैचारिक विरोध दर्शवण्याऐवजी महिलांचा अवमान करणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करणे आणि समाजात तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्राला सुसंस्कृतपणाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. महिलांचा अनादर करणारी ही विकृत भाषा महाराष्ट्राची जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही सहन करणार नाही.”
प्रशासनाला इशारा देताना सचिन दगडू पुढे म्हणाले की, “राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर नेणाऱ्या अशा नेत्यांवर प्रशासनाने कायद्यानुसार तात्काळ व कठोर कारवाई केली पाहिजे. जर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही, तर याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात याहून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या निषेध प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या वक्तव्याचा धिक्कार केला.

 

 

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button