वसमत प्रभाग क्र. ५ मधील प्रलंबित वीज समस्यांवर शिवसेनेचा धडक पाठपुरावा; ४ नवीन डीपींसह क्षमतेत वाढ करण्याचे शहर अभियंत्यांचे आश्वासन!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

- वसमत प्रभाग क्र. ५ मधील प्रलंबित वीज समस्यांवर शिवसेनेचा धडक पाठपुरावा; ४ नवीन डीपींसह क्षमतेत वाढ करण्याचे शहर अभियंत्यांचे आश्वासन!
वसमत:
वसमत शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वीज वापरामुळे निर्माण झालेल्या दीर्घकालीन विद्युत समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा करण्यात आला आहे. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा वसमत नगरपरिषदेच्या नगरसेविका डॉ. सौ. रेणुका गजानन पतंगे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि वसमत शहर अभियंता मा. श्री. मंत्री साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या मागण्यांचे दोन महत्त्वपूर्ण निवेदने सादर केली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
४ नवीन डीपी मंजूर करणे प्रभागातील वाढत्या वीज वापराचा ताण लक्षात घेता ४ नवीन वितरण ट्रान्सफॉर्मर (DP) त्वरित बसवण्यात यावेत.
डीपी क्षमतेत वाढ (Upgradation) ज्या भागांत विजेचा लोड जास्त आहे, तिथे १०० KVA ऐवजी २०० KVA चे नवीन डीपी बसवावेत.
धोकादायक खांब व तारा बदलणे जीर्ण, झुकलेले व अपघातप्रवण वीज खांब तसेच तुटलेल्या आणि लोंबकळणाऱ्या वीज तारा तातडीने बदलण्यात याव्यात.
“सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा आणि ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.”
— डॉ. सौ. रेणुका गजानन पतंगे (शिवसेना महिला जिल्हाप्रमुख व नगरसेविका, वसमत)
महावितरण प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन
या निवेदनावर तातडीने दखल घेत, वसमत शहर अभियंता मा. श्री. मंत्री साहेब यांनी प्रभाग क्र. ५ सह वसमत शहरातील विविध भागात लवकरच नवीन डीपी बसवण्याचे आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
याप्रसंगी मा. बालाजी टाकणाखार,
विकास टाकणाखार यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महायुतीचे/शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे प्रभाग क्र. ५ मधील वीज समस्येला लवकरच पूर्णविराम मिळणार असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

