वसमतच्या सिंचन प्रश्नावर मंत्रालयात खडाजंगी पाठपुरावा; आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकाराने जलसंपदा मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक! सिद्धेश्वर उपसा योजनेसाठी ४५ तर केळी पाझर तलावासाठी २.५ दलघमी पाणी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक चर्चा
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या सिंचन प्रश्नावर मंत्रालयात खडाजंगी पाठपुरावा; आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकाराने जलसंपदा मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!
सिद्धेश्वर उपसा योजनेसाठी ४५ तर केळी पाझर तलावासाठी २.५ दलघमी पाणी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक चर्चा
मुंबई:
वसमत मतदारसंघातील शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जलसुरक्षेसाठी स्थानिक आमदार राजूभैया नवघरे यांनी पुन्हा एकदा मंत्रालयात वजनदार पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आमदार नवघरे यांची मुंबईत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेसाठी ४५ दलघमी (MCM) आणि केळी पाझर तलावासाठी २.५ दलघमी (MCM) पाणी उपलब्ध करून देण्यावर अत्यंत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. केवळ पाणी मंजुरीच नव्हे, तर या प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनाला गती देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांवर जलसंपदा मंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे.
सिंचन क्षेत्रात होणार मोठी वाढ
आमदार राजूभैया नवघरे यांनी नेहमीच लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले आहे. या दोन्ही योजना पूर्णत्वास गेल्यास वसमत परिसरातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे.
“शेतकऱ्यांचा पाण्याचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील. या योजनेमुळे हजारो शेतकरी बांधवांच्या आयुष्यात कायमस्वरूपी समृद्धी येईल,”
असा विश्वास आमदार राजूभैया नवघरे यांनी यावेळी व्यक्त केला.

