बळीराजा संकटात! वसमत तालुक्यातील बळेगाव येथे पाऊस नसल्याने साध्या पद्धतीने पार पडला ‘बैलपोळा’; शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

बळीराजा संकटात! वसमत तालुक्यातील बळेगाव येथे पाऊस नसल्याने साध्या पद्धतीने पार पडला ‘बैलपोळा’; शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (हिंगोली):
कृषी संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेला आणि सर्जा-राजाच्या ऋणातून व्यक्त होण्याचा सण म्हणजे ‘बैलपोळा’. संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि वाजत-गाजत साजरा केला जातो. मात्र, वसमत तालुक्यातील बळेगाव येथे निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदाचा बैलपोळा अत्यंत साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. बळेगाव येथील शेतकरी बालाजी थोरात यांनी ऐन सणाच्या दिवशी ढोल-ताशांचा गजर आणि कोणताही भपका न करता, थेट शेतातच अगदी साध्या पद्धतीने पोळा साजरा करत आपल्या मुक्या जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पिके वाळू लागल्याने बळीराजा चिंतेत
यंदा पावसाने दडी मारल्याने संपूर्ण परिसर दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, हळद, ऊस व इतर सर्व मुख्य पिके डोळ्यांदेखत वाळू लागली आहेत. वर्षाची सर्व मेहनत आणि लावलेली पुंजी वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील शेतकरी प्रचंड आर्थिक व मानसिक चिंतेत सापडले आहेत.
शेतातच केला घरगुती पोळा साजरा
हाताशी आलेली पिके वाळत असताना सण कसा साजरा करायचा, असा गंभीर प्रश्न शेतकरी बालाजी थोरात यांच्यासमोर होता. गावच्या पोळा भरवण्यात आनंद साजरा करण्यापेक्षा, संकटाच्या या काळात आपल्या सर्जा-राजाची पूजा करून परंपरा टिकवणे त्यांनी पसंत केले. त्यांनी शेतातच आपल्या बैलांची पूजा केली, त्यांना नैवेद्य भरवला आणि अत्यंत घरगुती वातावरणात हा सण आटोपता घेतला.
“पिके वाळत असल्यामुळे मनामध्ये कोणताही आनंद उरलेला नाही. पण परंपरेनुसार आपल्या बैलांचे पूजन करणे गरजेचे होते, म्हणून आम्ही शेतातच अत्यंत साध्या पद्धतीने पोळा साजरा केला,” अशी खंत शेतकरी बालाजी थोरात यांनी व्यक्त केली.
निसर्गाने साथ दिली नसली तरी बळीराजाने आपली निष्ठा आणि परंपरा जपली आहे. आता तरी निसर्गाने कृपा करावी आणि वरूनराजाने हजेरी लावून वाळणाऱ्या पिकांना संजीवनी द्यावी, अशीच प्रार्थना वसमत तालुक्यातील सर्व शेतकरी करत आहेत.

