हिंगोलीत पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हरनामसिंग चव्हाण

हिंगोलीत पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
हिंगोली:
जिल्ह्यात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना मोठा फटका बसला आहे. या कठीण प्रसंगात शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून नुकसानीची योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
पालकमंत्री झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
सोयाबीन पिकाची स्थिती गंभीर
सेनगाव तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे असून सध्या पीक शेंगा लागणे आणि दाणे भरणे या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. मात्र, पावसाच्या दीर्घ ताणामुळे
पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे.
पाने पिवळी पडून कोमेजली आहेत.
अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आली आहेत.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
पाहणी दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी शेषेराव मोरे, शेख जाफर, शेख मुजीब, शेख वाजीद आणि सुभाष पारिस्कर या स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेत दिलासा दिला.
अहवाल सादर करण्याचे आदेश
जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे उद्भवलेल्या पीक परिस्थितीचा आणि नुकसानीचा सविस्तर अहवाल त्वरित राज्य शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिले.
या पाहणी प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

