आई-वडीलच मुलांचे खरे ‘रोल मॉडेल’: वसमत येथे ‘आजचं पालकत्व’ विषयावर मार्गदर्शन
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

आई-वडीलच मुलांचे खरे ‘रोल मॉडेल’: वसमत येथे ‘आजचं पालकत्व’ विषयावर मार्गदर्शन
लोकमंच टाईम्स
वसमत:
“मुलांचे भविष्य घडवण्याची खरी पायाभरणी शाळेपेक्षा आधी घरातूनच होते. मुलांची पहिली शाळा म्हणजे त्यांचे घर आणि पहिले शिक्षक हे आई-वडील असतात. त्यामुळे बदलत्या काळात पालकांनी स्वतः मुलांसमोर आदर्श निर्माण करून त्यांचे खरे ‘रोल मॉडेल’ बनले पाहिजे,” असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. रफीक शेख यांनी केले.
येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल व मुक्ताई विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “आजचं शिक्षण आणि उद्याचं भविष्य” या उपक्रमांतर्गत “आजचं पालकत्व” या विषयावर विशेष मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन (परभणी) चे प्रा. रफीक शेख यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून पालकांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक रोहिदास मगर होते.
कृतीतून संस्कार आणि डिजिटल शिस्त गरजेची
संवादादरम्यान प्रा. शेख म्हणाले, “मुले ऐकण्यापेक्षा पालकांच्या कृतीचे अनुकरण जास्त करतात. पालकांनी केवळ उपदेश न देता स्वतःच्या आचरणातून संस्कार दाखवले पाहिजेत. आजच्या डिजिटल युगात मुलांचा मोबाईल काढून घेणे हा उपाय नसून पालकांनी स्वतः डिजिटल शिस्त पाळून मुलांसमोर आदर्श ठेवला पाहिजे.”
पालकांनी मुलांची तुलना इतर मुलांशी न करता त्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना पाठबळ द्यावे. गुणांपेक्षा त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे आणि अपयशाच्या वेळी त्यांना सावरून पुन्हा उभे राहण्याचे बळ द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ गुण मिळवणे नसून संवेदनशील व जबाबदार माणूस घडवणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांचे शंकांनिरासन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रम दरम्याने आयोजित संवाद सत्रात पालकांनी मुलांचा अभ्यास, मोबाईलचा वापर, अभ्यासाचा ताण आणि शिस्त यांसारख्या विविध विषयांवर प्रश्न विचारले. प्रा. शेख यांनी साध्या व सोप्या उदाहरणांद्वारे पालकांच्या प्रश्नांचे निरसन केले.
पालकांसाठी प्रा. रफीक शेख यांनी दिलेला ‘१२ सूत्रांचा’ मंत्र:
मुलांसमोर स्वतः आदर्श बना.
मुलांशी दररोज मनमोकळा संवाद साधा.
इतर मुलांशी तुलना करणे टाळा.
मुलांच्या गुणांपेक्षा प्रयत्नांचे कौतुक करा.
अपयशाच्या काळात त्यांना आधार द्या.
मोबाईल वापरात स्वतः शिस्त पाळा.
मुलांच्या भावनिक गरजा समजून घ्या.
मुलांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य द्या.
त्यांना त्यांचे मत व्यक्त करू द्या.
घरात प्रेमळ व सुरक्षित वातावरण ठेवा.
भीतीऐवजी जबाबदारीतून शिस्त रुजवा.
केवळ गुणांमागे न धावता चांगला माणूस घडवण्याला प्राधान्य द्या.
या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी विठ्ठल घिके, हिरडगावकर काका, शाळेचे पदाधिकारी, शिक्षक व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील थोरात यांनी केले, तर मुख्याध्यापक नामदेव दळवी यांनी आभार मानले.

