पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा; राज्य शासनाचे पुरकपत्र जारी
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा; राज्य शासनाचे पुरकपत्र जारी
मुंबई:
नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार विभागाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ च्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत ‘शासन पुरकपत्र’ १५ जुलै २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
राज्य विधिमंडळाच्या २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात मा. मुख्यमंत्र्यांनी १० जुलै २०२६ रोजी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने आणि १४ जुलै २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हे सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत.
प्रमुख सुधारणा व निर्णय
२ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ
ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९’ चा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांनी ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज / पुनर्गठित कर्जाची ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकबाकी असल्यास अथवा ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेली मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम रु. २.० लाखांपर्यंत असल्यास, त्यांना जास्तीत जास्त २.० लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल.
एकवेळ तडजोड (OTS) रद्द:
मूळ शासन निर्णयातील (दि. ०२.०६.२०२६) ‘एकवेळ तडजोड’ (One Time Settlement – OTS) संबंधीचा परिच्छेद (ii) या सुधारणेद्वारे वगळण्यात आला आहे
प्रोत्साहनपर लाभाच्या वर्षात बदल
प्रोत्साहनपर लाभाच्या निकषांमधून सन २०२६-२७ हे वर्ष वगळण्यात आले आहे.
शासकीय अधिकृतता सदर शासन पुरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२६०७१५१९०३४९४८४७ असा आहे. हे पत्र सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण जराडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

