ताज्या घडामोडी

दुष्काळाने होरपळलेल्या पिकांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची पहिली पाळी द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

हरनामसिंग चव्हाण

दुष्काळाने होरपळलेल्या पिकांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची पहिली पाळी द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

वसमत (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या पिकांना वाचवण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कालव्याद्वारे पाण्याची पहिली पाळी देऊन पिकांना जीवनदान देण्यात यावे, अशी मागणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ हिंगोली व इतर समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन वसमत येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, चालू हंगामात सोयाबीन, मूग आणि उडीद ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेलेली आहेत. आता केवळ हळद व ऊस ही दोनच पिके तालुक्यातील शेतकऱ्यांचा एकमेव आधार उरली आहेत. मात्र, पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने ही पिकेही वाळू लागली आहेत.
शेतकऱ्यांना तात्काळ सिंचनासाठी पाणी मिळाले नाही, तर पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची पाळी सोडून शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने वेळेवर पाण्याची पाळी देऊन शेतकऱ्यांना सहकार्य केले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर समविचारी पक्ष/संघटनांच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष जुनेद रऊफखाँ पठाण यांच्यासह नारायण मुंजाजी कदम, माधवराव कदम, अस्लमखाँ इस्माईल खाँ, ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम आदी पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button