ताज्या घडामोडी

हिंगोली जिल्ह्यातील बंद पडलेली खरेदीखत नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करा; आ. राजुभैय्या नवघरे यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणी

हरनामसिंग चव्हाण

हिंगोली जिल्ह्यातील बंद पडलेली खरेदीखत नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करा; आ. राजुभैय्या नवघरे यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणी

मुंबई / वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
हिंगोली जिल्ह्यातील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे गेल्या काही काळापासून रखडलेली खरेदीखत (रजिस्ट्री) नोंदणीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैय्या नवघरे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आ. नवघरे यांनी आज मुंबई येथे महसूल मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शेतकरी आणि सर्वसामान्यांची मोठी आर्थिक कोंडी
हिंगोली जिल्ह्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खरेदीखत नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहे. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडल्याने जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नसराई, शेतीची कामे, शैक्षणिक खर्च आणि व्यवसायासाठी पैशांची नितांत गरज असताना दस्त नोंदणी बंद असल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे.
महसूल मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
जनसामान्यांच्या या जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नाची दखल घेत आ. राजुभैय्या नवघरे यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय व निर्माण झालेली परिस्थिती त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमधील तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर आणि सुरळीतपणे सुरू करावी, जेणेकरून सर्वसामान्यांची प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी मागणी त्यांनी केली.
या सविस्तर चर्चेनंतर महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ योग्य त्या सूचना देऊन खरेदीखत नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी आ. नवघरे यांना दिले.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button