शिकवणीविना घवघवीत यश! वसमतच्या सौरभ गुजराथी यांची बी.ए.एम.एस.साठी राज्य कोट्यातून निवड; वडिलांचे वैद्यकीय स्वप्न साकार हिंगोली येथील आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश निश्चित; घरच्या अभ्यासातून जिद्द व चिकाटीचे दर्शन
हरनामसिंग चव्हाण

शिकवणीविना घवघवीत यश! वसमतच्या सौरभ गुजराथी यांची बी.ए.एम.एस.साठी राज्य कोट्यातून निवड; वडिलांचे वैद्यकीय स्वप्न साकार
हिंगोली येथील आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश निश्चित; घरच्या अभ्यासातून जिद्द व चिकाटीचे दर्शन
वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी ) :
कोणत्याही महागड्या खासगी शिकवणीचा आधार न घेता, केवळ घरच्या घरी सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यास करून वसमत येथील सौरभ संजय गुजराथी यांनी वैद्यकीय शिक्षणाची झेप घेतली आहे. नीट (NEET-2026) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत त्यांनी बी.ए.एम.एस. (BAMS) अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून सौ. शांताबाई वैद्यप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे प्रवेश मिळवला आहे. या लक्षवेधी यशामुळे गुजराथी कुटुंबासह संपूर्ण वसमत शहरात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सौरभ हे वसमत येथील ‘श्री बालाजी फोटो स्टुडिओ’चे संचालक संजय गुजराथी यांचे चिरंजीव आहेत. छोटासा फोटो स्टुडिओ चालवून संजय गुजराथी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मर्यादित आर्थिक साधनांमध्ये आपल्या मुलाला वैद्यकीय क्षेत्रात शिकताना पाहावे, हे त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. कुटुंबाची परिस्थिती आणि वडिलांचे कष्ट याची पूर्ण जाणीव ठेवून सौरभ यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
नांदेड, लातूर किंवा वसमत येथे कोणतीही खासगी शिकवणी न लावता सौरभ यांनी सेल्फ-स्टडीवर भर दिला. नियोजनबद्ध वेळापत्रक आणि सातत्यामुळे त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले असून, त्यातून इतर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
आपल्या यशाबाबत बोलताना सौरभ गुजराथी यांनी सांगितले की, “भविष्यात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची आरोग्यसेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. समाजसेवेची आणि आरोग्यसेवेची संधी मिळत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे.”
सौरभ यांनी आपल्या या यशाचे श्रेय आजी तथा माजी मुख्याध्यापिका श्रीमती के. के. पत्ती/गुजराथी मॅडम, आई-वडील, दीदी तसेच मित्रपरिवाराला दिले आहे. सौरभ यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वसमत व हिंगोली परिसरातून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

