मराठवाड्याचा बुलंद आवाज शांत झाला; मुख्यमंत्र्यांनी परभणीत घेतले दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे अंत्यदर्शन “जनसामान्यांशी नाळ जोडणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले; मराठवाडा व धनगर समाजाची कधीही न भरून येणारी हानी” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावूक श्रद्धांजली
हरनामसिंग चव्हाण

मराठवाड्याचा बुलंद आवाज शांत झाला; मुख्यमंत्र्यांनी परभणीत घेतले दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे अंत्यदर्शन
“जनसामान्यांशी नाळ जोडणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले; मराठवाडा व धनगर समाजाची कधीही न भरून येणारी हानी” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावूक श्रद्धांजली
लोकमंच टाईम्स परभणी , दि. २३ :
जनसामान्यांचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडणारे आणि तळागाळातील घटकांशी जिव्हाळ्याची नाळ जोडणारे ज्येष्ठ नेते, खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने संपूर्ण मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतील कल्याणनगर येथील ‘गोविंद निवास’ येथे जाऊन दिवंगत खासदार वडकुते यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वडकुते कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
रविवारी दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ७२ व्या वर्षी रामराव वडकुते यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
तळागाळातील नेतृत्वाची कधीही न भरून येणारी पोकळी : मुख्यमंत्री
अंत्यदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “खासदार रामराव वडकुते यांचे अचानक जाणे ही अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना आहे. ते खऱ्या अर्थाने लोकांमध्ये रमणारे आणि मनमिळाऊ स्वभावाचे नेते होते. विधान परिषद सदस्य असो वा खासदार, त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर न्याय दिला. विशेषतः धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले असून, ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे.”
मान्यवरांची मोठी उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत यावेळी राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, परभणीचे महापौर सय्यद इकबाल आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव आणि उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यावेळी उपस्थित राहून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
उद्या हिंगोलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या निधनामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. उद्या (दि. २४) सकाळी १०:३० वाजता हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

