विशेष बातमी ६ ऑक्टोबर रोजी वसमत तहसील कार्यालयात ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ विशेष शिबिराचे आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
हरनामसिंग चव्हाण

विशेष बातमी
६ ऑक्टोबर रोजी वसमत तहसील कार्यालयात ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ विशेष शिबिराचे आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
वसमत (विशेष वृत्तसेवा):
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच सर्व आवश्यक दाखले व प्रमाणपत्रे एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी वसमत तहसील कार्यालय येथे विशेष “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” या अभियानाअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरामध्ये महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा संयुक्तपणे सहभागी होणार असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले व योजनांचा लाभ प्रत्यक्ष दिला जाणार आहे.
शिबिरात मिळणारे मुख्य दाखले व सेवा:
ओळखपत्रे व दाखले: आधार कार्ड दुरुस्ती/नोंदणी, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका (रेशन कार्ड), जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास (डोमिसाईल) दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र.
आरोग्य व कल्याणकारी योजना: आयुष्मान भारत कार्ड, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना इत्यादी.
प्रशासकीय समन्वय व आवाहन:
उपविभागीय अधिकारी श्री. विकास माने साहेब आणि वसमतचे तहसीलदार श्री. सारंग चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भटक्या विमुक्त समाज विकास उपविभाग स्तरीय समिती सदस्य श्री. मरिअन्ना नर्शीग अण्णा वाघमारे व श्री. अजयसिंग चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व गरजू नागरिकांना या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व योजनांचे वाटप केले जाईल. नागरिकांनी आपल्या सोबत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती आणून या मोहिमेत सहभागी व्हावे.
शिबिराचे स्थळ: तहसील कार्यालय, वसमत
दिनांक: ६ ऑक्टोबर
संपर्क क्रमांक: ९८८१२२४०८८ / ९५१८७६९४२७

