एसटी वाहकाचा प्रवाशांना मनस्ताप; सुट्ट्या पैशांवरून वाद अन् स्वतःला ‘संपादक’ सांगत प्रवाशांना धमकवण्याचा प्रकार!
हरनामसिंग चव्हाण

एसटी वाहकाचा प्रवाशांना मनस्ताप; सुट्ट्या पैशांवरून वाद अन् स्वतःला ‘संपादक’ सांगत प्रवाशांना धमकवण्याचा प्रकार!
![]()
परभणी / वसमत (लोकमंच टाईम्स
विशेष वृत्त):
एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण सेवा मिळणे अपेक्षित असताना, परभणी ते वसमत मार्गावर चालणाऱ्या एका एसटी बसमध्ये वाहकाकडून (कंडक्टर) प्रवाशांशी अत्यंत उद्धट वर्तन आणि हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. सुट्ट्या पैशांच्या कारणावरून प्रवाशांना उर्वरित रक्कम न देणे, स्वतःला एका दैनिकाचा संपादक सांगून धमकवणे आणि इच्छित थांब्यावर गाडी न थांबवणे अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८:३५ वाजता परभणी येथून सुटणारी (वसमत,भोकर फाटा मार्गे नांदेड) एसटी बस (क्रमांक: MH 09 EM 9604) मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने वसमतचे १२५ रुपयांचे तिकीट मागितले. प्रवाशाने २०० रुपयांची नोट दिली असता, कंडक्टरने ‘फोनपे’द्वारे ऑनलाइन पैसे देण्याचा आग्रह धरला. प्रवाशाने फोनपे वापरत नसल्याचे सांगितल्यावर, “सुट्टे आले तर उर्वरित रुपये परत करेन, नाही आले तर पैसे मिळणार नाहीत,” अशी भूमिका वाहकाने घेतली. यावरून प्रवासी आणि वाहकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
‘संपादक’ असल्याचे सांगत धमकवण्याचा प्रयत्न
वाहकाचे हे उद्धट वर्तन केवळ एका प्रवाशापुरते मर्यादित नव्हते, तर इतर प्रवाशांशीही तो अशाच प्रकारे बोलत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विशेष म्हणजे, वादादरम्यान वाहकाने स्वतःला एका दैनिकाचा ‘संपादक’ असल्याचे सांगून प्रवाशांना धमकवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे.
प्रवाशांची अडवणूक आणि विद्यार्थ्यांची हेळसांड
याच बसमधून प्रवास करणाऱ्या काही ग्रामीण भागातील प्रवाशांना त्यांच्या नियोजित गावी उतरायचे होते; मात्र वाहकाने गाडी केवळ मुख्य ठिकाणीच थांबेल असे सांगत त्यांना मध्ये उतरू दिले नाही, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, रस्त्यावर उभे राहून बसला हात दाखवणाऱ्या शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही बस न थांबवता पुढे निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रवाशांचे सवाल आणि प्रशासनाकडे मागणी
सुट्ट्या पैशांची जबाबदारी कोणाची? रोख पैसे दिल्यावर उर्वरित रक्कम परत न देण्याची धमकी देणे हा एक प्रकारे प्रवाशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? अशा प्रकारे मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित एसटी आगारातील वरिष्ठांचा काही वचक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे नागरिक आणि शेतकरी विविध समस्यांना तोंड देत असताना, दुसरीकडे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे होणाऱ्या गैरवर्तनामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकाराची एसटी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

