साहित्य म्हणजे मानवी भावना अन् समाजजीवनाचा खरा आरसा : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

साहित्य म्हणजे मानवी भावना अन् समाजजीवनाचा खरा आरसा : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे

वसमत (लोकमंच टाईम्स):
येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सद्भावना दिन’ आणि ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा. आसाराम लोमटे (परभणी) उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. रामचंद्र बागल यांनी भूषवले.
आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीत बोलताना आसाराम लोमटे म्हणाले, “साहित्य हे केवळ पुस्तके, कथा किंवा कविता नसून मानवी भावना व्यक्त करण्याचे प्रगल्भ माध्यम आहे. लिपीच्या शोधापूर्वी माणूस लोकसाहित्यातून व्यक्त होत असे.” १९७२ च्या भीषण दुष्काळाची आठवण करून देताना त्यांनी स्पष्ट केले की, बिकट परिस्थितीतही संस्कृतीची पाळेमुळे जपणारी माणसे समाजाला नवी दिशा देतात. साहित्य हे धर्म आणि समाजाला भानावर आणण्याचे आणि ललकारण्याचे काम करते. काळाच्या प्रतिसादातूनच साहित्याची निर्मिती होते.
आशय व अभिव्यक्तीवर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले, “समीक्षकीय शब्दांत न अडकता ‘आशय’ म्हणजे लेखकाच्या अंतःकरणाची हाक, तर ‘अभिव्यक्ती’ हे विचार मांडण्याचे माध्यम आहे. लेखक ज्या काळात वावरतो, त्या काळातील गुंते तो उकलत असतो. म्हणूनच साहित्य हा समाजजीवनाचा खरा आरसा आहे.”
कार्यक्रमाचे अन्य तपशील:
प्रास्ताविक: प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव
अध्यक्षीय समारोप: ॲड. रामचंद्र बागल
सूत्रसंचालन: डॉ. शारदा कदम
आभार प्रदर्शन: डॉ. उद्धव राऊत
प्रमुख उपस्थिती: संस्थेचे सचिव मा. आमदार पंडितराव देशमुख, संचालक रामचंद्रजी बागल, प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव, मुख्याध्यापक प्रविण शेळके आदी मान्यवर.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘प्रज्ञा परिसंवाद समिती’चे प्रा. प्रदीप इंगोले आणि प्रा. शिवराज यलपलवाड यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी परिसरातील लेखक, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

