वसमत शहरात मध्यरात्री थरार! घरात घुसून मारहाण, दरोडा अन् तरुणीचे अपहरण; ४ अज्ञात दरोडेखोरांचा धुमाकूळ
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत शहरात मध्यरात्री थरार! घरात घुसून मारहाण, दरोडा अन् तरुणीचे अपहरण; ४ अज्ञात दरोडेखोरांचा धुमाकूळ
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत:
वसमत शहरातील बुधवारपेठ भागात २८ ऑगस्टच्या मध्यरात्री बंदुकीचा धाक दाखवून अत्यंत भयानक दरोड्याची घटना घडली आहे. चार अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून घरमालकाला मारहाण करत रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लांबवले, तसेच २० वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसमत शहर व परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील बुधवारपेठ येथील रहिवासी हे २८ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री ३:०० ते ४:०० वाजताच्या सुमारास घरात झोपलेले असताना, चार अज्ञात पुरुषांनी संगनमत करून त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला.
आरोपींनी फर्यादी यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय बांधून ठेवले. त्यानंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. घरातील ९,२२५ रुपये रोख आणि तक्रारदाराच्या गळ्यातील सव्वा पाच ग्रॅमची सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेतली.
तरुणीचे बंदुकीच्या धाकावर अपहरण
दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी एवढ्यावरच न थांबता,
२० वर्षांची मुलगी हिला उचलून जबरदस्तीने सोबत नेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०५४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम 140(2), 309(6), 333, 115(2), 351(2), 3(5) अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर; तपास सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब (वसमत), पोलीस निरीक्षक वाघ साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक डेडवाल साहेब आणि पोह/५७६ भोपे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि डेडवाल साहेब (मो. ७८७५७८४४८५) हे करत असून, पोलीस अंमलदार वाघमारे (पोह/६२८) यांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून पोलीस आरोपींचा आणि अपृत तरुणीचा शोध घेत आहेत.
वसमत शहरातील मध्यवस्तीत घडलेल्या या सशस्त्र दरोडा आणि अपहरणाच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

