सोशियल मीडियावरून नगरवासीयांचा थेट सवाल: ‘आपला वसमत, आपली जबाबदारी’चा विसर? नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांचे फोटो व्हायरल!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

सोशियल मीडियावरून नगरवासीयांचा थेट सवाल: ‘आपला वसमत, आपली जबाबदारी’चा विसर? नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांचे फोटो व्हायरल!
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत:
“वसमत हे आपलं घर आहे आणि घराची स्वच्छता राखणं ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे!” — या वाक्याचा विसर पडल्यासारखे चित्र सध्या वसमत शहरात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. शहरातील तुंबलेल्या नाल्या आणि त्यामुळं रस्त्यावर येणारे सांडपाणी यावरून नागरिक नगरपालिकेकडे बोट दाखवत असले, तरी “नाल्या तुंबायला जबाबदार नेमके कोण?” असा रोखठोक सवाल आता सोशियल मीडियावर नागरिकच एकमेकांना विचारू लागले आहेत.
विशेष म्हणजे, स्वतःच्याच घरालगत असलेल्या नाल्यांमध्ये कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि टाकाऊ वस्तू फेकतानाचे फोटो सध्या सोशियल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. पाऊस सुरू होताच नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरत आहे. मात्र, याचे मुख्य कारण नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा हेच असल्याचे या व्हायरल फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे.
कचरा नाल्यात नव्हे, कचराकुंडीतच टाका!
पावसाळ्यात नाल्या तुंबू नयेत आणि शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
प्लास्टिक आणि घरातील कचरा नाल्यांमध्ये फेकू नका.
कचरा नेहमी घंटागाडीत किंवा ठरवून दिलेल्या कचराकुंडीतच टाका.
नाल्या मोकळ्या राहिल्या तरच पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल.
नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर सर्व खापर फोडण्यापेक्षा, वसमतकरांनी स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करण्याची गरज आहे. “माझे वसमत, माझी जबाबदारी” ही केवळ घोषणा न राहता प्रत्येकाने ती कृतीत आणली, तरच वसमत शहर स्वच्छ आणि सुंदर राहील.
आता तरी वसमतकर जागे होणार का? की नाल्यांमध्ये कचरा फेकून स्वतःच स्वतःच्या आरोग्याशी खेळत राहणार? असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

