ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारातून आपले भविष्य घडवावे : डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे वसमत येथे प्रतिपादन

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारातून आपले भविष्य घडवावे : डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे वसमत येथे प्रतिपादन

लोकमंच टाईम्स:
वसमत (विशेष प्रतिनिधी):
“विद्यार्थी हा देशाचा मुख्य आधारस्तंभ असून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी जडणघडण ही महाविद्यालयातच होत असते. यासाठी शिक्षकांचे संस्कार अत्यंत मोलाचे ठरतात. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिक कष्ट आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर स्वतःचे उज्ज्वल आयुष्य घडवावे,” असे ठाम प्रतिपादन लोकनेते, कार्यसम्राट तथा माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी केले.
वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयाच्या वतीने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘अभीष्टचिंतन सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अडथळ्यांवर मात करून यशाचे शिखर गाठा!
आपल्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा दाखला देत डॉ. मुंदडा पुढे म्हणाले की, “माणसाच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात, पण त्यावर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मात करून यश मिळवता येते. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही; ती प्राप्त करण्यासाठी केवळ प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. आज ग्रामीण भागातील आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील मुले केवळ अभ्यास व सकारात्मकतेच्या बळावर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचत आहेत, हा आदर्श प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.”
वाढदिवसानिमित्त सामाजिक व विधायक उपक्रमांचा धडाका
डॉ. मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. ‘एक परिवार वृद्धाश्रम’ (पळसगाव) येथे वृद्धांना शाल वाटप, परिसरात वृक्षारोपण, विद्यार्थिनींना मोफत बस पास वितरण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
दिग्गजांची हजेरी आणि राजकीय वातावरण निर्मिती
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची भक्कम उपस्थिती लाभली होती.
मंचावर सौ. रीतादेवी मुंदडा, संस्थेचे सहसचिव राजेश दिगंबरराव मंचेवार, संजय कुबडे, प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अनुजा सोमाणी, सौ. शारदा मुंदडा, मुंजाजीराव इंगोले, संभाजी बेले, डॉ. धोंडीराम पार्डीकर, श्याम पांडे, दीपक मुंदडा, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, माजी सभापती अंकुश आहेर, माजी सभापती रामकिशन झुंझुल्डे, नगरसेवक राजेश पवार, रत्नाकर अडसिरे, काशीनाथ भोसले, तानाजी कदम, गणेश काळे, अतुल गोरे, चंद्रकांत चहाड, विनोद मज्जनवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांनी केले. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले, तर आभार डॉ. ज्ञानेश्वर गाडे यांनी मानले.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button