वसमतच्या शहर पेठ गुरुद्वारा रोड येथे अतिवृष्टीमुळे अपूर्ण घरकुलाची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वासराचा दुर्दैवी मृत्यू
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या शहर पेठ गुरुद्वारा रोड येथे अतिवृष्टीमुळे अपूर्ण घरकुलाची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वासराचा दुर्दैवी मृत्यू
वसमत (प्रतिनिधी):
वसमत शहरातील ‘शहर पेठ गुरुद्वारा रोड’ (प्रभाग क्रमांक ५) येथे लागोपाठ झालेल्या अतिवृष्टीमुळे एका अपूर्ण घरकुलाची भिंत कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने एका वासराचा जागीच मृत्यू झाला असून घर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली. मा. तहसीलदार सारंग साहेब यांच्या सूचनेनुसार तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा पूर्ण केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मृत वासराचे शवविच्छेदन (PM) करून संबंधित अहवाल तयार केला आहे. बाधित कुटुंबाला लवकरच नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
‘लोकमंच टाईम्स’च्या बातमीची दखल
या दुर्दैवी घटनेबाबत ‘लोकमंच टाईम्स’ ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची तातडीने दखल घेण्यात आली. बातमीचे गांभीर्य ओळखून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख (हिंगोली) व नगरसेवक डॉ. सौ. रेणुका गजानन पतंगे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि प्रशासनाला घटनास्थळी धाव घेण्यास भाग पाडले.
अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या या पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

