ताज्या घडामोडी

वसमत तालुक्यात पावसाची दडी! कोरड्या दुष्काळाचे सावट; सोयाबीन, तूर अन कापूस करपण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेच्या गर्तेत

मुख्य संपादक:हरनामसिंग चव्हाण

वसमत तालुक्यात पावसाची दडी! कोरड्या दुष्काळाचे सावट; सोयाबीन, तूर अन कापूस करपण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेच्या गर्तेत

लोकमंच टाईम्स (विशेष बातमी)
हरनामसिंग चव्हाण, वसमत:
वसमत: मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच निसर्गाने फिरवलेली पाठ आणि तब्बल दीड महिना उलटूनही दमदार पावसाने दिलेली हुलकावणी… यामुळे वसमत तालुका सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. तुटपुंज्या आणि रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खते-बियाणे खरेदी करून कशीबशी पेरणी उरकली खरी, पण आता पावसाने पार दांडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
भेगाळलेली शेती अन कोमेजलेली पिके
तालुक्यातील नद्या, नाले आणि ओढे अजूनही कोरडेठाक पडले असून यंदा एकही पूर आलेला नाही. कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे शेतातील मातीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. सध्या सोयाबीनचे पीक वाढीच्या आणि शेंगा धरण्याच्या संवेदनशील टप्प्यात आहे, मात्र पाण्याअभावी ते माना टाकत आहे. हीच अवस्था तूर आणि कापसाची असून त्यांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. पिके वाळू लागल्याने उत्पादनात प्रचंड घट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कर्जाचा डोंगर अन् निसर्गाचा कोप
“लाखो रुपये कर्ज काढून, उसने-पासने करून खते आणि बियाणे आणले. जिवापाड मेहनत करून पेरणी केली, पण निसर्गाने पुरती निराशा केली आहे. येत्या चार-पाच दिवसांत जर दमदार पाऊस झाला नाही, तर आमचे संपूर्ण पीक जळून खाक होईल.”
— वसमत तालुक्यातील हवालदिल शेतकरी

आर्थिक संकटाची टांगती तलवार
येत्या दोन-तीन दिवसांत जर मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही, तर तालुक्यातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचे शंभर टक्के नुकसान होऊन बळीराजा पुरता कोलमडून पडेल. कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, या चिंतेने वसमत तालुक्यातील शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून निसर्गाच्या कृपेची वाट पाहत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button