वसमत येथे पशुधनाचा चारा औद्योगिक वापरासाठी नेणाऱ्या २ पिकअप गाड्यांवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांची धाड; वाहने जप्त
हरनामसिंग चव्हाण

वसमत येथे पशुधनाचा चारा औद्योगिक वापरासाठी नेणाऱ्या २ पिकअप गाड्यांवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांची धाड; वाहने जप्त
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (हिंगोली):
हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठीचा चारा (कुटार/भुसा) औद्योगिक वापरासाठी नेणाऱ्यांवर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. आज वसमत येथे सोयाबीनचा भुसा बेकायदेशीरपणे वाहून नेणाऱ्या २ पिकअप गाड्यांवर तहसीलदार सारंग चव्हाण व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत त्या गाड्या तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाची तूट राहिल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी १२ ऑक्टोबर २०२६ पासून सोयाबीन, तूर व इतर पिकांचे कुटार केवळ पशुधनाच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कुटाराचा वापर बायोमास ब्रिकेट्स (गट्टू) निर्मिती किंवा औद्योगिक इंधनासाठी करण्यास तसेच विनापरवानगी जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कारखान्यासाठी भुसा नेत असताना रंगेहात कारवाई
सोयाबीनच्या भुशापासून गट्टू तयार करणाऱ्या कारखान्यासाठी हा भुसा वाहून नेला जात असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी कृषी विभागाच्या सहकार्याने तातडीने धाड टाकून दोन्ही पिकअप गाड्या ताब्यात घेतल्या. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर चारा वाहतूक आणि साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईच्या वेळी महसूल विभाग आणि कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुटाराची अवैध वाहतूक किंवा औद्योगिक वापर करणाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’, ‘जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५’ आणि ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून वाहने व साठा जप्त केला जाणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे वसमत तालुक्यातील पशुपालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

