हिंगोली पोलीस दलात खळबळ: बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे पोलीस अधीक्षकांचे कडक निर्देश! कार्यमुक्त न केल्यास प्रभारी अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई; हिंगोली पोलीस दलाचा मोठा निर्णय
हरनामसिंग चव्हाण

हिंगोली पोलीस दलात खळबळ: बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे पोलीस अधीक्षकांचे कडक निर्देश!
कार्यमुक्त न केल्यास प्रभारी अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई; हिंगोली पोलीस दलाचा मोठा निर्णय
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक : हरनामसिंग चव्हाण
हिंगोली:
हिंगोली जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय आणि विनंती बदली झालेल्या पोलीस अंमलदारांच्या बाबतीत पोलीस अधीक्षक कार्यालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. बदली झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना आजच्या आज तात्काळ नूतन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे स्पष्ट व कडक आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस उप अधीक्षक (गृह) हरिश गवळी यांच्या स्वाक्षरीने दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या बिनतारी संदेशानुसार, सर्व पोलीस स्टेशन, शाखा प्रभारी अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उद्या सकाळी १० वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
पोलीस अधीक्षकांच्या मान्यतेने निघालेल्या या पत्रात असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करून त्याचा अहवाल १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत विहित नमुन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर सादर करावा लागणार आहे.
तसेच, ज्या पोलीस अंमलदारांना काही कारणास्तव कार्यमुक्त करण्यात आलेले नाही, त्यांना कार्यमुक्त न करण्याचे कारण काय? याबाबतचा लेखी खुलासा प्रभारी अधिकाऱ्यांनी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हलगर्जीपणा केल्यास प्रभारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!
प्रशासकीय बदल्यांच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा या आदेशाद्वारे देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या किंवा विलंब करणाऱ्या संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बदलीवर कार्यमुक्त केलेल्या तसेच कार्यमुक्त करणे शिल्लक असलेल्या पोलीस अंमलदारांची संपूर्ण माहिती दिलेल्या तक्त्यानुसार सादर करण्याचे आदेशही सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

