हिंगोली जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन भूजल पातळी वाढवावी युक्तधारा अभियानाअंतर्गत ४० हजार ‘जलतारा’ संरचनांची नोंद व जिओ-टॅगिंगचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश ग्रामपंचायतींनी १२ ऑक्टोबरपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हरनामसिंग चव्हाण

हिंगोली जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन भूजल पातळी वाढवावी
युक्तधारा अभियानाअंतर्गत ४० हजार ‘जलतारा’ संरचनांची नोंद व जिओ-टॅगिंगचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
ग्रामपंचायतींनी १२ ऑक्टोबरपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
हिंगोली :
जिल्ह्यातील उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून जलसंधारण, भूजल पुनर्भरण, पाणीपुरवठा व सिंचनाशी संबंधित कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. युक्तधारा अभियानाअंतर्गत ४० हजार ‘जलतारा’ जलसंधारण संरचनांची नोंद करून त्यांचे जिओ-टॅगिंग करावे, तसेच जिल्ह्यातील विहिरींचीही अचूक नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलशक्ती अभियानाअंतर्गत ‘जलसंचय जन भागीदारी’बाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (GSDA) वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. भालचंद्र संगनवार, मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.एस. ढोके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) केशव गड्डापोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले प्रमुख निर्देश व सूचना:
निधीचा नियोजित वापर: जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे GSDA, जलशक्ती अभियान, PMWDC आणि जिल्हा नियोजन समिती (DPC) यांच्या निधीशी समन्वय साधून राबवावीत. बंधित निधीचा वापर केवळ पाणीविषयक कामांसाठीच करून भूजल पातळी वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
जुन्या संरचनांचे पुनरुज्जीवन: जुन्या पाणीपुरवठा, सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या संरचनांचे पुनरुज्जीवन करणे तसेच पृष्ठभागीय जलस्रोतांच्या पुनर्स्थापनेची कामे त्वरित हाती घ्यावीत.
जलजीवन मिशन व शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग: जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा व विद्युतविषयक कामांना नियमानुसार प्राधान्य द्यावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्यजल संधारण) उभारण्यासाठी तत्काळ आराखडे तयार करावेत.
१५ वा वित्त आयोग व १५ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव: पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातील बंधित व अबंधित निधीचा जास्तीत जास्त वापर करावा. सर्व ग्रामपंचायतींनी याबाबतचे प्रस्ताव १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित गट विकास अधिकाऱ्यांकडे (BDO) सादर करावेत.
DPC कामांचे प्रस्ताव शुक्रवारपर्यंत: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव येत्या शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
संभाव्य पाणीटंचाईबाबत कृती आराखड्याचे सादरीकरण
बैठकीदरम्यान भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. भालचंद्र संगनवार यांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने तयार केलेल्या कृती आराखड्याचे सादरीकरण केले. यामध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजना, भविष्यात आवश्यक असणारी कामे आणि यामध्ये समाविष्ट असलेल्या गावांची सविस्तर माहिती देण्यात आली.

