ताज्या घडामोडी

हिंगोली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! पाचही तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कडक आदेश पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास थेट कारवाई; ५०० मीटरच्या आत विहिरी खोदण्यास मनाई

हरनामसिंग चव्हाण

हिंगोली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! पाचही तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कडक आदेश
पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास थेट कारवाई; ५०० मीटरच्या आत विहिरी खोदण्यास मनाई

हिंगोली (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी) :
खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने मारलेल्या दडीमुळे हिंगोली जिल्ह्यावर मोठे जलसंकट ओढवले आहे. जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही तालुक्यांमध्ये प्रशासनाकडून अधिकृतपणे ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आक्रमक पावले उचलली असून, “जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यालाच सर्वोच्च प्राधान्य राहील!” असा स्पष्ट आणि इशारावजा आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिला आहे.
शासकीय निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ घोषित झाला असून, त्यात हिंगोलीतील पाचही तालुक्यांचा समावेश आहे. आगामी भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला जलसाठा इतर कोणत्याही कामासाठी वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची ‘ॲक्शन मोड’ नियमावली :
बेकायदेशीर उपशावर सर्जिकल स्ट्राइक : धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
पंप आणि पाइपलाइन जप्त होणार : चोरीच्या मार्गाने पाणी उपसण्यासाठी वापरले जाणारे मोटर पंप, पाइपलाइन व इतर यंत्रसामग्रीवर तहसीलदार, पोलीस आणि जलसंपदा विभागाने संयुक्तपणे थेट कायदेशीर कारवाई करावी.
५०० मीटरच्या मर्यादेत विहीर खोदण्यास मनाई : महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ अंतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटरच्या अंतरात कोणत्याही हेतूसाठी नवीन विहीर खोदण्यास कठोर बंदी घालण्यात आली आहे.
१ किमी परिसरात भूजल उपशावर निर्बंध : टंचाईच्या काळात सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांच्या १ किलोमीटरच्या व्याप्तीत भूजलाच्या अति-उपशावर कडक प्रतिबंध आणि नियमन केले जाईल.
दर आठवड्याला रिपोर्ट सादर करा : सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागाने परस्परांशी समन्वय ठेवून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा.
जिल्हा प्रशासनाच्या या धडक निर्णयामुळे पाणीमाफिया आणि अनधिकृत उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button