ग्रामरोजगार सहाय्यकांचा धडक आंदोलनाचा एल्गार! वसमत तालुक्यात आजपासून बेमुदत ‘कामबंद’; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा वणवा पेटणार
हरनामसिंग चव्हाण

ग्रामरोजगार सहाय्यकांचा धडक आंदोलनाचा एल्गार! वसमत तालुक्यात आजपासून बेमुदत ‘कामबंद’; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा वणवा पेटणार
लोकमंच टाईम्स
हरनामसिंग चव्हाण
वसमत (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने वसमत तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी शासनाच्या जुलमी निर्णयांविरोधात आरपारची लढाई छेडली आहे. प्रलंबित मागण्या आणि जाचक अटींच्या निषेधार्थ दि. २३ सप्टेंबर २०२६ पासून तालुक्यात बेमुदत ‘कामबंद’ आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला असून, यामुळे मनरेगाची सर्व कामे पूर्णपणे ठप्प होण्याचे संकेत मिळत आहेत.
या आंदोलनासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BD0) प्रफुल्ल तोटावाड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन धडकवले. गावपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांवर शासनाच्या नव्या निर्णयामुळे बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे, असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
प्रमुख मागण्या ज्यांसाठी पेटला आंदोलनाचा वणवा
मनुष्यदिन निर्मितीची जाचक अट तात्काळ रद्द करा.
ग्रामरोजगार सहाय्यकांना कायमस्वरूपी सेवा संरक्षण द्या.
पीक कालावधीत केली जाणारी मानधन कपात त्वरित थांबवा.
वर्षभराचे थकीत व पूर्ण मानधन नियमित अदा करा.
काम करताना तांत्रिक आणि प्रशासकीय संरक्षण पुरवा.
“शासनाच्या निर्णयामुळे आमच्या रोजगारावरच गदा येत आहे. रात्रंदिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत एकही काम केले जाणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल!”
— संघटना पदाधिकारी
नेतृत्व आणि सहभाग
या निवेदनावर अध्यक्ष कैलास सोळंके, उपाध्यक्ष संजय भंडारे, सचिव ज्ञानेश्वर जामगे, सहसचिव गोपीनाथ खंदारे, कोषाध्यक्ष माणिकराव पवळे यांच्यासह नामदेव नरवाडे, पिराजी धायजे, कामाजी कोरडे, रामप्रसाद कदम, ज्ञानेश्वर डोके, रमाकांत भालेराव, वैजनाथ गायकवाड, दीपक राऊत, गजानन खेबळे, मधुकर जगताप, मंगेश इंगोले, माधव नरवाडे आणि भारत मुदणर यांच्या प्रमुख स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामरोजगार सहाय्यक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा आणि विकासाचा गाडा पूर्णपणे रुतणार असून, आता शासन या आंदोलनाची दखल कधी घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

