वसमत उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार व्हेंटिलेटरवर! दीड वर्षांपासूनची ‘स्वच्छता बोंबाबोंब’ आणि आरोग्य सुविधांच्या वानव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; प्रशासनाला दणका देण्यासाठी थेट कारवाईची मागणी
हरनामसिंग चव्हाण

वसमत उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार व्हेंटिलेटरवर! दीड वर्षांपासूनची ‘स्वच्छता बोंबाबोंब’ आणि आरोग्य सुविधांच्या वानव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; प्रशासनाला दणका देण्यासाठी थेट कारवाईची मागणी
वसमत (जि. हिंगोली)लोकमंच टाईम्स:

वसमत तालुक्यातील गोरगरीब व सामान्य जनतेच्या आरोग्याची भिस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सध्या अत्यंत अनागै कारभाराच्या विळख्यात सापडला आहे. रुग्णालयातील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेली स्वच्छतेची गंभीर समस्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा अभाव या मुद्यांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) आक्रमक झाली आहे. शहर उपाध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रविराज डोलसे यांनी आमदार राजूब भैया नवघरे, आरोग्य मंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपायुक्त यांच्याकडे सविस्तर निवेदने देत प्रशासनाच्या धिंडवडे काढले आहेत.
१. स्वच्छतेची लाजीरवाणी अवस्था; एजन्सीला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची मागणी
वसमत उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून स्वच्छतेचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. सामान्य नागरिक, रुग्णांचे नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण कल्याण समिती सदस्यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित स्वच्छता एजन्सीच्या कामात सूतभरही सुधारणा झालेली नाही. वरिष्ठांच्या सूचनांनाही केराची टोपली दाखवली जात असल्याने रुग्णालयाची स्वच्छता रामभरोसे सुरू आहे.
संबंधित स्वच्छता एजन्सीच्या कामाची कसून चौकशी करून कसूर किंवा हलगर्जीपणा आढळल्यास त्यांना तात्काळ काळी यादीत (Black List) टाकून कठोर कारवाई करावी.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, कामाचे वाटप आणि स्वच्छतेच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी तपासणी करावी.
रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड आणि अधिकृत ओळखपत्र (ID Card) सक्तीचे करावे, जेणेकरून शिस्त येईल.
२. सिटीस्कॅन, एम.आर.आय. आणि ट्रॉमा केअर सेंटरसाठी धोरणात्मक लढा
वसमत शहर, तालुका तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र आहे. मात्र, येथे सिटीस्कॅन, एम.आर.आय. आणि डिजिटल एक्स-रे सारख्या मूलभूत व अत्याधुनिक सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. परिणामी, गंभीर रुग्णांना उपचारासाठी नांदेड, परभणी किंवा हिंगोलीसारख्या दूरच्या शहरांत धाव घ्यावी लागते. वेळेवर निदान व उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा गरिबांच्या जिवाशी खेळ होतो.
यावर मात करण्यासाठी खालील मागण्या रेटल्या जात आहेत:
उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन आणि एम.आर.आय. मशीन मंजूर करून ती त्वरित कार्यान्वित करावी.
वाढत्या रस्ते अपघातांची भीषण परिस्थिती पाहता, अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी स्वतंत्र ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करून आवश्यक जागा व निधी उपलब्ध करून द्यावा.
आवश्यक बांधकाम, वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निधी व प्रशासकीय मान्यता द्यावी.
“फक्त कागदोपत्री सोपस्कार नकोत, प्रत्यक्ष कृती हवी!”
नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या अतिसंवेदनशील प्रश्नांची प्रशासनाने केवळ कागदोपत्री दखल न घेता, प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि घेतलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जर यावर तात्काळ योग्य निर्णय झाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

