पोलीस अन् महसूल प्रशासनाची संवेदनशील ‘खाकी’ आणि ‘खादी’! हिंगोलीत त्या अनोळखी ‘त्या’ दुर्दैवी मृताला मिळाला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप; पोलीस व महसूल प्रशासनाने पार पाडले अंत्यसंस्कार
हरनामसिंग चव्हाण

पोलीस अन् महसूल प्रशासनाची संवेदनशील ‘खाकी’ आणि ‘खादी’!
हिंगोलीत त्या अनोळखी ‘त्या’ दुर्दैवी मृताला मिळाला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप; पोलीस व महसूल प्रशासनाने पार पाडले अंत्यसंस्कार
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
हिंगोली (विशेष प्रतिनिधी):
समाजात माणुसकी आणि संवेदनशीलतेचा वस्तुपाठ घालून देणारी एक अत्यंत भावूक अन् वाखाणण्याजोगी घटना हिंगोली शहरात घडली आहे. पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे दाखल अकस्मात मृत्यू क्रमांक ३१/२०२६ (कलम १९४, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) मधील अनोळखी मयत पुरुषाची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, अद्यापपर्यंत ओळख न पटल्याने या बिगरवारस मयतावर रिसाला बाजार येथील स्मशानभूमीत पूर्ण सन्मानपूर्वक अंत्यविधी पार पाडण्यात आले.
पोलीस अन् महसूल यंत्रणेची कर्तव्यदक्षता
ओळख पटू न शकलेल्या या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तासनतास पडून न ठेवता किंवा दुर्लक्षित न करता, हिंगोली शहर पोलीस ठाणे आणि महसूल विभागाने तातडीने समन्वय साधत सामाजिक दायित्व जपले.
या कार्यात हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे, पोलीस शिपाई डोंगरदिवे, पोलीस शिपाई लेकुळे यांनी प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया अत्यंत तत्परतेने पूर्ण केली. त्यांना महसूल विभागाचे तलाठी अनिल काळे, महसूल सेवक सचिन राठोड तसेच नगरपरिषद विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत केली.
रिसाला बाजार स्मशानभूमीत अखेरचा निरोप
सर्व कायदेशीर बाबी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, या अनोळखी मयत इसमाचा आत्मा शांत व्हावा या भावनेने रिसाला बाजार येथील स्मशानभूमीत सर्व उपस्थितांच्या साक्षीने हिंदू/शासकीय रीतीरिवाजांनुसार सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
“नातं कोणतंही नसलं, तरी माणुसकीचं नातं सर्वात मोठं असतं.”
या उक्तीची प्रचीती देत हिंगोली पोलीस, महसूल व नगरपरिषद प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वस्तरातून जोरदार कौतुक होत आहे.

