श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या पहिल्या प्रकाश पर्वाचा सोहळा; महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार! भाजपा शीख सेल महाराष्ट्र प्रमुख गुरदीपसिंग संधू यांच्या पुढाकाराने नांदेडमध्ये स्तुत्य उपक्रम
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण


श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या पहिल्या प्रकाश पर्वाचा सोहळा; महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार!
भाजपा शीख सेल महाराष्ट्र प्रमुख गुरदीपसिंग संधू यांच्या पुढाकाराने नांदेडमध्ये स्तुत्य उपक्रम
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
नांदेड (विशेष प्रतिनिधी):
सिख धर्माचे महान व पवित्र धर्मग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वाच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून नांदेड येथे एका भव्य सामाजिक उपक्रमाचा पडदा उठला. भारतीय जनता पक्षाचे शीख अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख गुरदीपसिंग संधू यांच्या विशेष पुढाकारातून शनिवार, १२ सप्टेंबर रोजी गुरुद्वारा गेट नंबर १ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिरा’ला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा फायदा घेतला.
मुख्यमंत्री सहायता निधी व सेवाभावी संस्थांचा संयुक्त हातभार
हे महाआरोग्य शिबिर केवळ तपासणीपुरते मर्यादित न राहता, रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध दिसले. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष तसेच श्री गुरु रामदासजी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरात ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ कार्ड त्वरित बनवून देण्याची विशेष सोय उपलब्ध करण्यात आली होती.
एकाच छताखाली विविध आजारांवर मोफत उपचार
या महाआरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे सामान्य रुग्णांसोबतच अत्यंत क्लिष्ट आजारांचे निदान करण्यात आले. यामध्ये
शस्त्रक्रिया व अस्थिव्यंग (हाडांचे विकार)
बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ सेवा
नेत्रविकार व दंतरोग तपासणी
फिजिओथेरपी व विशेष रक्तदान शिबिर
या सर्व विभागांमध्ये हजारो रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरवण्यात आले.
पावन अरदासने शिबिराचा प्रारंभ
शिबिराचा शुभारंभ गुरुद्वाराचे हेड ग्रंथी स. सरबजितसिंगजी निर्मले यांनी केलेल्या पावन अरदासने (प्रार्थनेने) झाला. यावेळी मीत जत्थेदार संत बाबा रामसिंगजी आणि बाबा बलविंदरसिंगजी कारसेवाले यांची प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद लाभले.
या भव्य उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी राज्यसभेचे खा. डॉ. अजित गोपछडे, आ. अमर राजूरकर, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वरजी नाईक, भाजपा डॉक्टर आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर, गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक रविंदरसिंग कपूर, सहाय्यक अधीक्षक जयमलसिंग ढिल्लो यांच्यासह बलविंदरसिंग फौजी, रवींद्रसिंग बुंगई, गुरमीतसिंग महाजन, भागींदरसिंग घडीसाज, जगदीपसिंग नंबरदार, महेंद्रसिंग लांगरी, जसबीरसिंग धुपिया, हरविंदरसिंग कपूर, सुखविंदरसिंग हूंदल, राजासिंग फौजी, गुरप्रीतसिंग सोखी, हरप्रीतसिंग पुजारी, पवितसिंग आरतिया आणि मनप्रितसिंग हूंदल यांनी अथक परिश्रम घेतले.
श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या शिकवणीनुसार ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणणाऱ्या या उपक्रमाचे नांदेड शहर व परिसरातून जोरदार कौतुक होत असून आयोजक गुरदीपसिंग संधू यांचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत.

