वसमत शहरात खळबळ: “तू पोलिसांना टिप का देतो?” म्हणत २२ वर्षीय तरुणाची दगड-विटांनी ठेचून निघृण हत्या!
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत शहरात खळबळ: “तू पोलिसांना टिप का देतो?” म्हणत २२ वर्षीय तरुणाची दगड-विटांनी ठेचून निघृण हत्या!
वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
वसमत शहरातील सोमवार पेठ परिसरात १० सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुणाचा दगड आणि विटांनी बेदम मारहाण करून अत्यंत निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “तू पोलिसांना आमची टिप का देतो?” असा संशय घेऊन तिघा आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केले असून या घटनेमुळे संपूर्ण वसमत शहरात तीव्र खळबळ उडाली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
मृत तरुणाचे नाव गणेश दिगंबर गुंडाळे (वय २२ वर्षे, मूळ रा. रुपला पांढरी, ता. पूर्णा, जि. परभणी; सध्या रा. पाटील नगर, वसमत) असे आहे.
दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास गणेश गुंडाळे हा सोमवारी पेठ भागात असताना, तिघा आरोपींनी त्याला अचानक गाठले. “तू पोलिसांना आमची टिप का देतो?” असा आरोप करत आरोपींनी त्याला दगड आणि विटांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन गणेशचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस कारवाई व गुन्हा दाखल:
या प्रकरणी फिर्यादी पवन माणिकराव डाखोरे (वय २७ वर्षे, रा. पळसगाव, ता. वसमत) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद: गु.र.नं. ०५७५/२०२६
कलम १०३(१), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये तिघा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोउपनि शिवाजी बोंडले यांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि परगेवार करत आहेत.
आरोपी अद्याप फरार:
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, वसमत शहर पोलीस आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करून शोध घेत आहेत. या निर्घृण हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.

