मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा: वसमत कौठा पॉईंटवर सकल मराठा समाजाचा भव्य ‘रास्ता रोको’
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा: वसमत कौठा पॉईंटवर सकल मराठा समाजाचा भव्य ‘रास्ता रोको’

वसमत लोकमंच टाईम्स: प्रतिनिधी:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सकल मराठा समाज (ग्रामीण व शहर, वसमत) च्या वतीने वसमत येथील कौठा पॉईंट येथे दुपारी १ ते ३ या वेळेत तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान मराठा आरक्षणाच्या जोरदार घोषणांनी कौठा पॉईंट परिसर दुमदुमून गेला होता. समाजातील सर्व घटकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेषतः महिला भगिनी आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. दुपारी १ ते ३ या दोन तासांच्या कालावधीत झालेल्या या रस्तारोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मराठा समाजाला न्याय व हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धार या वेळी उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
— छाया नागेश चव्हाण, वसमत

