धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वसमत उपविभागीय कार्यालयात धडक; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वसमत उपविभागीय कार्यालयात धडक; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत:
महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वसमत तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी (ST) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेत महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकदीने आणि गांभीर्याने लढा द्यावा, अशी ठाम भूमिका समाजाने मांडली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
एसटी आरक्षणाची प्रभावी मांडणी: ८ सप्टेंबर २०१९ पूर्वी शासनाने आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक आणि घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे. तसेच अनुभवी व सक्षम वकिलांची नियुक्ती करून धनगर जमातीची बाजू प्रभावीपणे मांडावी.
‘प्लॅन बी’ ची तयारी सर्वोच्च न्यायालयातून कोणताही प्रतिकूल निर्णय आल्यास धनगर समाजाला एसटी चे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने तात्काळ ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा.
संत बाळूमामा देवस्थान कायदा श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष शासकीय कायदा करण्यात यावा. विश्वस्त मंडळात किमान ११ विश्वस्त असावेत आणि अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीलाच देण्यात यावे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक नामकरण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला स्वातंत्र्यवीर शिर्पोजा धनगर यांचे नाव देण्यात यावे.
चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकास ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्यात यावे.
धनगर जमातीच्या या न्याय्य आणि हक्काच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी याप्रसंगी करण्यात आली.
समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती:
हे निवेदन देतेवेळी वसमत तालुक्यातील धनगर समाजातील प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बालासाहेब बारहाते, गणपतराव तागडे, शामराव हिरवे, लिंबाजी उन्हाळे, विश्वनाथ गवारे, प्रभाकर बारसे, बालाजी होळकर, गोरखनाथ मंलाडे, संभाजी मुंजाळ, श्रीराम वड्डे, कुशोबा जमरे, बालाजी काळे, संभाजी हिरवे, दिलीप रेनगडे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

