औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औंढा नागनाथ आणि कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी ५० कोटींचा निधी मंजूर
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औंढा नागनाथ आणि कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता
आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी ५० कोटींचा निधी मंजूर
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
मुंबई:
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करताना नैसर्गिक रंगांचा वापर करून संवर्धन करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत औंढा नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच, पुण्यातील आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’ थीम पार्कच्या चौथ्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, आमदार प्रवीण दटके आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख विकास निर्णय व निधीची तरतूद
औंढा नागनाथ मंदिर (हिंगोली): मंदिराचा संवर्धन व विकास आराखडा ₹१९३,५५,२०,४७४ (१९३.५५ कोटी रुपये) खर्चाचा असणार आहे.
कल्याणेश्वर मंदिर (नागपूर): मंदिराच्या सुधारित विकास आराखड्यासाठी ₹७२.४९ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
शिवसृष्टी थीम पार्क (पुणे): आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी ₹५० कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
औंढा नागनाथ मंदिर परिसर विकास योजना
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खालील कामे हाती घेतली जातील:
संवर्धन व जीर्णोद्धार नंदी मंडप, ओवरी, दर्शन बारी, हरीहर तलाव आणि परिसरातील उपमंदिरांचे जतन.
भाविकांसाठी सुविधा २५०० क्षमतेचा अद्ययावत प्रतीक्षा कक्ष, नवीन भक्त निवास, माहिती केंद्र आणि जलद दर्शन व्यवस्था.
इतर कामे पुरातन मूर्तींचे संग्रहालय (म्युझियम), दगडी स्थापत्यशैलीचा साज, मोठे वृक्षारोपण, बाह्य विद्युतीकरण, रोषणाई आणि सीसीटीव्ही सुरक्षा.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराचे मूळ वैभव जपण्याचे तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भाविकांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले.
कल्याणेश्वर मंदिर (नागपूर) सुधारित आराखडा
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणेश्वर मंदिर परिसरात हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण केले जाईल.
पारंपरिक पार्किंग व्यवस्था यांत्रिक (Mechanical) पार्किंगऐवजी दोन स्तरांवरील सोयीस्कर तळघर (Basement) पार्किंगची व्यवस्था असेल.
प्रस्तावित बांधकामे मंदिराच्या शिखराचे बांधकाम, भव्य सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसाद गृह, वेदशाळा, योगशाळा व प्रशासकीय कार्यालये.
शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क (पुणे)
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आंबेगाव (पुणे) येथे ‘शिवसृष्टी’ प्रकल्प उभारला जात आहे. प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. हा प्रकल्प आशियातील एक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित केला जात आहे.



