राजकुमार रावण एंगडे यांची वसमत उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

राजकुमार रावण एंगडे यांची वसमत उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड!
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत (जि. हिंगोली):
वसमत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज, गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत श्री. राजकुमार रावण एंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विहित मुदतीत उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी ही अधिकृत घोषणा केली.
नगरपरिषद सभागृहात दुपारी ठीक १२:४५ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी प्राधिकृत केलेले पिठासीन अधिकारी तथा वसमतचे तहसीलदार श्री. सारंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणुकीच्या निर्धारित वेळेत श्री. राजकुमार रावण एंगडे यांचा एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने, पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची वसमत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीच्या घोषणेनंतर वसमत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष श्री. राजकुमार एंगडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. सुनिता मनमोहन बाहेती यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या विशेष सभेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, शहर अभियंता नागनाथ देशमुख, विभाग प्रमुख अरविंद शिकारी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

