रक्षाबंधनानिमित्त वसमतच्या मुख्य बाजारात नो-व्हीकल झोन करा; पोलिसांना निवेदन सादर
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

रक्षाबंधनानिमित्त वसमतच्या मुख्य बाजारात नो-व्हीकल झोन करा; पोलिसांना निवेदन सादर
लोकमंच टाईम्स
वसमत प्रतिनिधी:
रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वसमत शहरातील मुख्य बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिला भगिनींची तुफान गर्दी उसळत आहे. मात्र, बाजारातील अस्ताव्यस्त वाहतूक आणि रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेत मुख्य बाजारपेठेत बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करावी, अशी जोरदार मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुख्य चौक अन् रस्ते वाहतूक कोंडीच्या विळख्यात
सत्यनारायण टॉकीज, मामा चौक, झेंडा चौक, महावीर चौक आणि कारंजा चौक या प्रमुख मार्गांवर दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे सणानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना पायी चालणेही कठीण झाले आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या:
नो-व्हीकल झोन व बॅरिकेटिंग गर्दीच्या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात यावी.
दुकानांसमोरील पार्किंगवर बंदी: व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर अस्ताव्यस्त गाड्या उभ्या करण्यास तात्काळ प्रतिबंध करावा, जेणेकरून खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना मोकळेपणाने वावरता येईल.
रक्षाबंधनाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलून मुख्य बाजारात वाहतूक नियोजन करावे, अशी ठाम मागणी वार्ताहर नागेश विश्वनाथराव चव्हाण यांनी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

