वसमत नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग; अनुभवी अन् स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याला संधी देण्याची वसमतकरांची मागणी!
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग; अनुभवी अन् स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याला संधी देण्याची वसमतकरांची मागणी!
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली (नगर विकास विभाग) यांच्या वतीने काढण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेतच नवीन उपध्यक्षांची निवड होणार आहे.
सध्या वसमत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आलेल्या सौ. सुनीताताई मनमोहन बाहेती या कार्यरत आहेत. आता नगराध्यक्षपदी महिला नेतृत्व असताना, उपध्यक्ष पद हे एखाद्या अनुभवी महिला नेत्याला मिळते की अनुभवी पुरुष उमेदवाराच्या पारड्यात जाते, याकडे संपूर्ण वसमत शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
अनुभवी महिलेला संधी मिळाल्यास पहिल्यांदाच पूर्ण ‘महिला राज’!
जर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी एखाद्या अनुभवी महिला लोकप्रतिनिधीला संधी दिली, तर वसमत नगर परिषदेच्या इतिहासात ‘प्रथमच पूर्णतः महिला राज’ पाहायला मिळेल. यामुळे महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय सुरू होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
‘फिल्डिंग’ अन् वरिष्ठ पातळीवर शिफारसींचा पूर
उपाध्यक्ष पदावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. आपले समर्थक कार्यकर्ते आणि मित्रांमार्फत वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे नाव सुचवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे.
वसमतकरांना हवाय ‘विकास अन् स्वच्छ प्रतिमा’
वसमत शहराचा विकास आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी आगामी उपाध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पक्षाने किंवा नगरसेवकांनी निवडीदरम्यान कोणत्याही वैयक्तिक राजकीय गणितांपेक्षा “अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमेच्या” उमेदवारालाच प्राधान्य द्यावे, अशी ठाम भावना वसमतकरांकडून व्यक्त केली जात आहे. निष्कलंक व कार्यक्षम नेत्याची निवड झाल्यास भविष्यात शहराच्या विकासाला मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

