सुनेत्रावहिनींच्या माध्यमातून वसमतच्या विकासाला गती; आमदार राजूभैया नवघरे यांची सदिच्छा भेट
मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

सुनेत्रावहिनींच्या माध्यमातून वसमतच्या विकासाला गती; आमदार राजूभैया नवघरे यांची सदिच्छा भेट
वसमत (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याप्रमाणेच सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनीही आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीने आणि आपुलकीच्या संवादाने कार्यकर्त्यांच्या मनात आणि जनतेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी केले.
आज वसमत मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात आमदार राजूभैया नवघरे यांनी मुंबई येथे सौ. सुनेत्रावहिनी पवार यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून, सर्व कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन वहिनींनी दिले.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार नवघरे म्हणाले, “मुंबईत असताना दादांकडे ज्या हक्काने आणि विश्वासाने आम्ही कामासाठी जायचो, अगदी तशाच हक्काने आज वहिनींकडे जातो. त्या अतिशय तळमळीने आणि आपुलकीने प्रत्येक प्रश्न ऐकून घेऊन तो सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. राजकारणात नवीन असूनही त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.”
विकासाची धुरा सांभाळताना प्रत्येक कार्यकर्त्याची वैयक्तिक विचारपूस करणे आणि अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहणे ही त्यांची कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. “विकासाची बात, वहिनींची साथ” या विश्वासाने वसमत क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास आमदार नवघरे यांनी व्यक्त केला.

