श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भारतीय ज्ञानपरंपरेत अमूल्य योगदान – प्रा. डॉ. शशिकांत तोळमारे
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भारतीय ज्ञानपरंपरेत अमूल्य योगदान – प्रा. डॉ. शशिकांत तोळमारे
वसमत (लोकमंच टाईम्स बातमीदार):
स्थानिक श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब भिंगोले यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन भावूक सत्कार केला.
प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना प्रा. डॉ. शशिकांत तोळमारे म्हणाल्या, “भारतीय संस्कृती, ज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या समृद्ध परंपरेला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जागतिक स्तरावर नवी उंची मिळवून दिली. भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व जगाच्या व्यासपीठावर पोहोचवण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “हा दिन साजरा करत असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या फुले दांपत्यानेच शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यामुळे आज समाजात शिक्षणाचा व्यापक प्रसार शक्य झाला आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योतीराम चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभारप्रदर्शन आणि अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब भिंगोले यांनी केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

