अवैध गोवंश कत्तल प्रकरण उपनगराध्यक्षांवर कडक कारवाई आणि अपात्रतेच्या मागणीसाठी वसमत कडकडीत बंद!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

अवैध गोवंश कत्तल प्रकरण उपनगराध्यक्षांवर कडक कारवाई आणि अपात्रतेच्या मागणीसाठी वसमत कडकडीत बंद!


वसमत
वसमत शहराचे उपनगरध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नासेर अली यांच्या मालकीच्या शेतात अवैध गोवंश कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ‘सकल हिंदू समाज, वसमत’ यांच्या वतीने आज वसमत शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात ३० जुलै २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार (गुन्हा कलम २०५/२०२६), उपनगरध्यक्ष सय्यद इम्रान यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर १९ गोवंशीय जनावरे (गायी, बैल, गुरे) कत्तल करण्याच्या उद्देशाने अत्यंत हालअपेष्टेत आणि इजा होईल अशा स्थितीत आढळून आली. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकल हिंदू समाजाच्या मुख्य मागण्या
कडक कायदेशीर कारवाई धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम २९९ व ३०३(२) समाविष्ट करून आरोपींवर ‘मोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कडक कारवाई करावी आणि तात्काळ अटक करावी.
पदावरून अपात्रतेची मागणी महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायती अधिनियम १९६५ मधील कलम १६ व ४४ नुसार कायद्याचे उल्लंघन व पदाचा गैरवापर केल्यामुळे उपनगरध्यक्षांना तात्काळ अपात्र ठरवण्यात यावे किंवा त्यांचा राजीनामा घेण्यात यावा.
इतर दोषींवर कारवाई सदर शेतजमीन ज्यांच्या नावे आहे त्यांच्यावर आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सर्व सह-आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
अवैध संपत्तीची चौकशी आरोपीने गेल्या ५ वर्षांत जमवलेल्या अवैध संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा.
२४ तासांचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, पुढील २४ तासांत नमूद मागण्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास येणाऱ्या दिवसांत अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.

