कुरुंदकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची जपानमधील जागतिक परिषदेसाठी निवड; श्रीहर्ष शिंदेचा ‘FOSS4G-2026’ मध्ये शोधनिबंध
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

कुरुंदकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची जपानमधील जागतिक परिषदेसाठी निवड; श्रीहर्ष शिंदेचा ‘FOSS4G-2026’ मध्ये शोधनिबंध
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
कुरुंदा:
येथील नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्रीहर्ष लक्ष्मणराव शिंदे याची जपानमधील हिरोशिमा येथे होणाऱ्या ‘FOSS4G-2026’ या प्रतिष्ठित जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे. देशातील ७२ पात्र विद्यार्थ्यांमधून निवड झालेला तो एकमेव प्रतिनिधी ठरला आहे.
या जागतिक व्यासपीठावर श्रीहर्ष ‘भौगोलिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानावरील स्वयंचलित चाचणी आणि सतत एकात्मतेद्वारे MapLibre मध्ये Tile ची गुणवत्ता सुनिश्चित करणे’ या विषयावर शोधनिबंध सादर करेल. नकाशातील विविध भागांची गुणवत्ता मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकाद्वारे आपोआप तपासण्यासाठी त्याने ‘Tile Guard’ हे विशेष Automated Quality-Assurance Framework विकसित केले आहे. येत्या २ सप्टेंबर २०२६ रोजी हिरोशिमा येथे जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञांसमोर तो या प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे.
श्रीहर्ष हा नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले पाटील यांचा नातू, तर माणकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. बी. शिंदे यांचा मुलगा आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागास मानल्या जाणाऱ्या मराठवाड्यातून जागतिक मुक्त-स्रोत (Open-Source) तंत्रज्ञान व्यासपीठापर्यंत पोहोचत त्याने प्रांताचे नाव उज्ज्वल केले आहे. कठोर मेहनत आणि सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते, असा संदेश त्याने या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यालयातर्फे भव्य सत्कार समारंभ
या ऐतिहासिक यशाबद्दल नरहर कुरुंदकर विद्यालयात श्रीहर्षसह त्याच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष स्थान: श्री. दत्तरामजी इंगोले
प्रमुख उपस्थिती: संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले पाटील (सपत्नीक), सरपंच राजेश पाटील इंगोले, सहसचिव शामराव पांडे, गणेश वटमे, बाळू मानकरी, पत्रकार बालाजी काळे, बंडू गुळगुळे, दिलीपराव इंगोले, मुख्याध्यापक मुंजाजी देलमाडे, उपमुख्याध्यापक दिगंबर पडोळे आणि पर्यवेक्षक भागाप्पा पत्रे.
सूत्रसंचालन व आभार प्रास्ताविक शामराव पांडे यांनी केले, सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी तर आभार प्रदर्शन राम ठेंगे यांनी मानले.
या सोहळ्यास परिसरातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

