‘कोरड्या दुष्काळात तेरावा महिना!’: कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला भीषण आग; तुळजापूरवाडीतील शेतकऱ्याचे १ लाख २० हजारांचे नुकसान
हरनामसिंग चव्हाण

‘कोरड्या दुष्काळात तेरावा महिना!’: कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला भीषण आग; तुळजापूरवाडीतील शेतकऱ्याचे १ लाख २० हजारांचे नुकसान

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (प्रतिनिधी):
निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरळ शिवार (गट क्र. १७२) येथे काढणी करून रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अचानक आग लागून लाखो रुपयांचे पीक जळून खाक झाले आहे. या घटनेत तुळजापूरवाडी (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकरी लक्ष्मण कालाजी चव्हाण यांचे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
कापणी करून रचली होती गंजी, अन् मध्यरात्री आगीचा भडका
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी लक्ष्मण चव्हाण यांनी आपल्या आरळ शिवारातील गट क्र. १७२ मधील २.१७ आर क्षेत्रातील सोयाबीनची काल (दि. ०८ ऑक्टोबर २०२६) काढणी केली होती. सोयाबीन एकत्र करून त्यांनी शेतात २ गंज्या रचून ठेवल्या होत्या. मात्र, ०८ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११:०० वाजेच्या सुमारास अचानक एका गंजीला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण सोयाबीन जळून भस्मसात झाले.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख २० हजार रुपयांचे थेट नुकसान झाले आहे. या प्रकरणी पीडित शेतकरी लक्ष्मण चव्हाण (वय ४२) यांनी हट्टा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे. या घटनेची नोंद हट्टा पोलीस ठाण्याच्या जनरल डायरीत (जी.डी. क्र. ०११/२०२६) करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई व पंचनाम्यासाठी तपास हवालदार (पोह/६७०) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी
कष्टाने पिकवलेले धान्य डोळ्यांदेखत जळून खाक झाल्यामुळे चव्हाण कुटुंबियांवर मोठा आर्थिक आघात झाला आहे. “कोरड्या दुष्काळात तेरावा महिना” अशीच काहीशी अवस्था या घटनेमुळे झाली असून, महसूल व पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनेचा रीतसर पंचनामा करून योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने व ग्रामस्थांनी केली आहे.

